डीजेमुक्त उत्सव, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सोशल मीडियावर दक्ष राहण्याचे आवाहन
अमळनेर: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील वाणी मंगल कार्यालय येथे जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि गुण्यागोविंदाने साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला.
याप्रसंगी गणेश मंडळांचे पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच पत्रकार बांधवांनी विविध समस्या व सूचना मांडल्या. अमळनेर तालुक्यात यंदा १७५ गणेश मंडळांची पूर्वतयारी बैठक घेण्यात आली आहे. बैठकीदरम्यान उपस्थित नागरिकांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, विसर्जनासाठी शहरात कृत्रिम विसर्जन केंद्रे उभारणे, परवानग्यांसाठी ‘एक खिडकी योजना’ राबवणे आणि डीजेच्या आवाजावर नियंत्रण ठेवणे अशा महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या.
प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की, खड्डे बुजवण्याचे काम विहित मुदतीत पूर्ण केले जाईल, विसर्जनासाठी ३ घाट सज्ज राहतील तसेच अग्निशामक यंत्रणा पूर्ण तयारीत असून परवानग्यांसाठी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षकांचे महत्त्वाचे आवाहन:
आपल्या अध्यक्षीय भाषणात पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे म्हणाले, “अमळनेरची जनता नेहमीच सहकार्य करणारी आहे. मागील उत्सवात क्षुल्लक कारणांमुळे गुन्हे दाखल झाले होते; मात्र यंदा सर्वांनी मिळून हा सण गुण्यागोविंदाने साजरा करायचा आहे. मंडळांनी मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, महिलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे, महाप्रसादादरम्यान विषबाधा होणार नाही याची काळजी घ्यावी आणि डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत डीजेमुक्त उत्सव साजरा करावा.” तसेच सोशल मीडियावर इतर धर्मियांच्या भावना दुखावतील असे वादग्रस्त स्टेटस किंवा पोस्ट ठेवू नयेत, असे सक्त आवाहनही त्यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती:
या बैठकीस मंचावर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, एपिआय साजिद मन्सूरी, गणेश अहिरे, मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगराध्यक्ष डॉ. बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.