अमळनेर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत मल्लांचा थरार; १२० खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

   अमळनेर  : महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय शासकीय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा अमळनेर तालुका क्रीडा संकुल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील मल्लांनी सहभागी होत कुस्तीच्या आखाड्यात आपले कौशल्य पणाला लावले. चुरशीच्या लढतींमुळे उपस्थित क्रीडाप्रेमींना कुस्तीचा थरार अनुभवता आला.


    या स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील विविध शाळा व ज्युनिअर कॉलेजमधील १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुले व मुली मिळून सुमारे १२० मल्लांनी सहभाग घेतला. विविध वजनगटांमध्ये झालेल्या लढतींमध्ये मल्लांनी आक्रमक डावपेच, ताकद आणि कौशल्याचे दर्शन घडविले.

   स्पर्धेचे उद्घाटन अमळनेर पोलीस विभागाच्या पीएसआय कविता ठाणगे यांच्या हस्ते झाले. यावेळी अमळनेर कुस्ती महासंघाचे बाळूभाऊ पाटील, माजी नगरसेवक प्रताप आबा पाटील, दामिनी पोलीस विभाग प्रमुख नम्रता जरे, संजय पाटील भुतबापू, पैलवान संजय भिला पाटील, क्रीडा अध्यक्ष एस. पी. वाघ आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व श्रीफळ फोडून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

    स्पर्धेचे पंच म्हणून महेश माळी यांनी काम पाहिले. तसेच समितीचे सदस्य के. आर. बाविस्कर, प्रा. प्रितेश तुरणकर, बापूराव सांगोरे, आर. ए. घुगे, स्वप्नील पाटील, गोकुळ बोरसे यांनी स्पर्धेचे नियोजन व व्यवस्थापन केले.यावेळी एच. आर. बाविस्कर, अरविंद मोरे, रविंद्र भोई, योगराज चौधरी, पवन शिंपी, भावेश कोळी यांच्यासह क्रीडाप्रेमी, शिक्षक व पालक उपस्थित होते.

   स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून विजेते ठरलेल्या अमळनेर तालुक्यातील सर्व मल्लांचे मान्यवरांनी अभिनंदन केले. तसेच पुढील स्तरावरील स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!