अमळनेर : शहरासह ग्रामीण भागातील क्रीडाप्रेमी, युवा खेळाडू आणि बालकांसाठी आनंदाची बातमी आहे. येथील विजय नाना पाटील आर्मी स्कूल व ज्युनिअर कॉलेज परिसरात क्रिकेट नेट प्रॅक्टिससह अॅम्युझमेंट पार्क उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून क्रिकेटपटूंना सरावाची सुविधा मिळण्याबरोबरच विविध मैदानी खेळांसाठी खेळाडूंना मैदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे अमळनेरच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या प्रस्तावित क्रीडा व मनोरंजन सुविधांच्या अनुषंगाने माजी मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष विजय नाना पाटील यांनी काही कर्मचाऱ्यांसह जागेची पाहणी केली. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा. शाम पवार यांनी प्रस्तावित उपक्रमाबाबत माहिती दिली.

शिक्षण महर्षी नानासाहेब विजय नवल पाटील, माजी केंद्रीय मंत्री तथा संस्थाध्यक्ष
“अमळनेर शहर व ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात उत्तम संधी मिळावी, त्यांच्यातील क्रीडागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. क्रिकेट नेट प्रॅक्टिससह विविध मैदानी खेळांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर बालक, युवक आणि कुटुंबीयांना विरंगुळ्यासाठी अॅम्युझमेंट पार्कची सुविधा मिळणार आहे. या माध्यमातून अमळनेरमध्ये निरोगी जीवनशैली, क्रीडा संस्कृती आणि खेळाडू घडविण्याच्या प्रक्रियेला चालना मिळावी, अशी आमची भूमिका आहे.

