मंगळग्रह जन्मोत्सवाचा आज भक्तिमय सोहळा; पंचामृत अभिषेकासह ५६ भोगांचा नैवेद्य

     अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी परम पवित्र श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होणार आहे. मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे आयोजित या सोहळ्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांना दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घेता येणार आहे.

     सोहळ्याची सुरुवात पहाटे ४ वाजता श्री मंगळग्रह देवांच्या मूर्तीवर पंचामृत अभिषेकाने होईल. सकाळी ६ वाजता फुलांनी सजवलेल्या पाळण्यात श्री मंगळग्रह देवांचा प्रतिकात्मक जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. सकाळी ७ वाजता मंदिरावरील जुने ध्वज उतरवून नवीन ध्वजांचे विधीवत ध्वजारोहण करण्यात येईल. त्यानंतर महाआरती होऊन श्री मंगळग्रह देवांना ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण केला जाणार आहे.

     दुपारी १ वाजता रेती, शेती व मातीशी निगडित समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी श्री महाभोमयागाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता वाद्यवृंदाच्या गजरात श्री मंगळग्रह देवांची मंदिर परिसरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून, सायंकाळी ६ वाजता महाधुपारती होणार आहे.

     श्री मंगळग्रह मंदिर हे खानदेशातील प्रमुख श्रद्धास्थान असून, येथे श्री मंगळग्रह देवांची स्वयंभू मूर्ती असल्याची श्रद्धा आहे. मंदिर परिसरात भूमीमातेची दाक्षिणात्य शैलीतील मूर्ती, पंचमुखी हनुमान, भगवान श्री गुरुदत्त-माता अनघालक्ष्मी तसेच भगवान श्री कालभैरव-माता भैरवी यांच्या मूर्ती असल्याने या स्थळाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

     या जन्मोत्सव सोहळ्यासाठी भाविकांनी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री मंगळग्रह देवांचे दर्शन, तीर्थप्रसाद व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेच्या समस्त विश्वस्त मंडळ व सेवेकऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!