निम शिवारात हिंस्र प्राण्याचा वासरावर हल्ला; तीन वर्षीय वासराचा मृत्यू डॉ. संदीप जोशी यांच्या गोशाळेच्या आवारातील घटना; वनविभागाने बिबट्या नसून ‘तळस’ प्राण्याचा हल्ला असल्याचे स्पष्ट केले

 अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यातील निम शिवारात एका हिंस्र वन्यप्राण्याने तीन वर्षीय वासरावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अमळनेर येथील डॉ. संदीप जोशी यांच्या शेतात सुरू असलेल्या गोशाळेच्या आवारात ही घटना घडली.

डॉ. जोशी यांच्या मालकीचे शेत निम शिवारात असून, निम येथील शेतकरी सुदाम पाटील हे या शेतातील कामकाज पाहतात. घटनेच्या दुसऱ्या दिवशी सुदाम पाटील कामाच्या ठिकाणी आले असता त्यांना वासरू मृतावस्थेत आढळून आले. अज्ञात हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने अमळनेर वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

दरम्यान, वनपाल गुलाब पिंजारी यांनी घटनास्थळी पाहणी करून प्राण्याच्या पायांच्या ठशांची तपासणी केली. त्यांच्या माहितीनुसार, वासरावर हल्ला करणारा प्राणी बिबट्या नसून ‘तळस’ हा हिंस्र प्राणी असल्याचे स्पष्ट केले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात ये-जा करताना विशेष काळजी घ्यावी. तसेच परिसरात बिबट्या असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

या घटनेमुळे निम शिवारातील शेतकरी व पशुपालकांमध्ये वन्यप्राण्यांच्या वावराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!