पांझरा नदीतील अवैध वाळू उपशामुळे जलसाठ्याला धोका; मांडळच्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्याच्या दुरुस्तीची मागणी! २०० वर्षांपूर्वीच्या दगडी बंधाऱ्याला तडे; पाणीगळती आणि बेसुमार वाळू उपशामुळे भविष्यात पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची ग्रामस्थांना भीती

 अमळनेर : तालुक्यातील मांडळ गावाजवळ पांझरा नदीवर असलेल्या सुमारे २०० वर्षांपूर्वीच्या ब्रिटिशकालीन दगडी बंधाऱ्याची दुरवस्था झाली असून, बंधाऱ्याला ठिकठिकाणी तडे गेल्याने मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत आहे. त्यातच पांझरा नदीपात्रातून होत असलेल्या बेसुमार अवैध वाळू उपशामुळे नदीची जलपातळी घटण्याची भीती व्यक्त होत असून, भविष्यात परिसरातील गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर मांडळ येथील ब्रिटिशकालीन बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक निधी मंजूर करावा, अशी मागणी माजी सभापती तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, मांडळ येथील पांझरा नदीवरील हा ऐतिहासिक दगडी बंधारा सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे. बंधाऱ्याच्या खालून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून, पाण्यासोबत वाळूदेखील बाहेर वाहून जात आहे. या बंधाऱ्यामुळे मांडळ, वावडे, जवखेडा यांसह परिसरातील गावांमधील विहिरींची पाणीपातळी टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे या बंधाऱ्याचे महत्त्व केवळ जलसाठ्यापुरते मर्यादित नसून परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेशीही जोडलेले आहे.

अवैध वाळू उपशामुळे नदीपात्राचे अस्तित्व धोक्यात?

दरम्यान, पांझरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध वाळू उपशाचा मुद्दाही आता गंभीर बनत आहे. नदीपात्रातील बेसुमार वाळू उपशामुळे नैसर्गिक जलसाठा आणि भूजल पुनर्भरण प्रक्रियेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. नदीपात्रातील वाळूचा साठा कमी झाल्यास परिसरातील विहिरींची पाणीपातळी घटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. आधीच बंधाऱ्याला तडे जाऊन पाणीगळती होत असताना अवैध वाळू उपशाची समस्या अधिक चिंताजनक ठरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

बंधारा फुटल्यास परिसरातील गावांवर पाणीटंचाईचे सावट!

बंधाऱ्याची वेळीच दुरुस्ती न झाल्यास मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाहून जाण्याची आणि परिसरातील विहिरींची पाणीपातळी खालावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बंधाऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने संपूर्ण दुरुस्ती करून त्यावर दोन फूट उंचीचे काँक्रीटीकरण केल्यास पाणी अडविण्याची क्षमता वाढण्यास मदत होऊ शकते, अशी सूचना डॉ. दीपक पाटील यांनी केली आहे.

त्यामुळे जलसंपदा विभागाने बंधाऱ्याची तातडीने तांत्रिक पाहणी करून दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करावा, आवश्यक निधी मंजूर करावा तसेच पांझरा नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर प्रभावी नियंत्रण ठेवावे, अशी मागणी पुढे येत आहे.

या निवेदनाच्या प्रती लघु पाटबंधारे विभाग, धुळे तसेच जिल्हाधिकारी, धुळे यांनाही देण्यात आल्या आहेत. आता ब्रिटिशकालीन बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागणार का आणि पांझरा नदीपात्रातील अवैध वाळू उपशाला आळा बसणार का, याकडे मांडळसह परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!