अमळनेर येथे महिला पतंजली योग समितीतर्फे ‘जडीबुटी दिवस’ उत्साहात साजरा; अंबर्षी टेकडीवर वनौषधींचे वृक्षारोपण

अमळनेर : महिला पतंजली योग समिती, अमळनेर तहशीलच्या वतीने आचार्य बाळकृष्ण स्वामी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ४ ऑगस्ट रोजी अंबर्षी टेकडी येथे ‘जडीबुटी दिवस’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विविध प्रकारच्या वनौषधी रोपांचे यशस्वीपणे वृक्षारोपण करण्यात आले.

​कार्यक्रमा दरम्यान तुळस, कढीपत्ता, लिंबू, कोरफड, कडुलिंब, आवळा, सीताफळ, जांभूळ आणि गवतीचहा यांसारख्या अनेक उपयुक्त व आरोग्यदायी वनस्पतींची लागवड करण्यात आली. प्रारंभी आचार्यजींना वंदन करून त्यांनी औषधी वनस्पतींच्या क्षेत्रात केलेल्या संशोधन कार्याबद्दल उपस्थितांना माहिती देण्यात आली. जिल्हा कोषाध्यक्षा रत्नाताई भदाणे व कामिनी पवार मॅडम यांनी या औषधी वनस्पतींचे महत्त्व आणि त्यांचे आरोग्यदायी उपयोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

​या उपक्रमाला नगरसेविका योगिता कापडणेकर यांची विशेष उपस्थिती लाभली होती. तसेच योगशिक्षक निवेदिता कापडणे आणि प्रा. उषा पवार यांच्यासह पतंजलीचे योगशिक्षक व योगसाधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत वृक्षारोपणाच्या कार्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

​कार्यक्रमाच्या शेवटी पर्यावरण संरक्षण व योगाचा प्रसार करणाऱ्या विविध घोषणा देण्यात आल्या. उपस्थितांच्या उत्साहामुळे आणि सहकार्यामुळे हा जडीबुटी दिवस अत्यंत यशस्वीपणे पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!