दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांची घरपट्टी-पाणीपट्टी माफ करा! वसुलीसाठी तगादा लावू नये; क्रांतिकारी शेतकरी संघटनेची बीडीओंकडे मागणी

अमळनेर : अमळनेर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने तसेच रोजगाराच्या संधी कमी झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांकडे घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी तगादा लावण्यात येऊ नये, तसेच दुष्काळग्रस्त नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी पूर्णपणे माफ करण्यात यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.यासंदर्भात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) यांना निवेदन देण्यात आले.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही, शेतमजुरांना रोजगार मिळत नाही आणि सर्वसामान्य कुटुंबांना दैनंदिन खर्च भागवणेही कठीण झाले आहे. अशा संकटाच्या काळात घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी नागरिकांना नोटिसा देणे, सक्ती करणे अथवा मानसिक त्रास देणे थांबवावे. शासनाने दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी घरपट्टी व पाणीपट्टी माफीचा निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.तसेच शासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन ग्रामपंचायतींना योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद विनायक पाटील, ईश्वर उखा पाटील, संदीप सैंदाने, हुमेश पाटील, अॅड. युवराज कोळी, जितेंद्र प्रभाकर काटे, भूषण कोळी, दिलीप पाटील, रविंद्र पाटील आणि राजिक मुजावर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!