“अवमान सहन करणार नाही”; अमळनेर तहसील कार्यालयासमोर काँग्रेसकडून संजय निरुपम यांचा निषेध

अमळनेर: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राचा अवमान केल्याच्या निषेधार्थ अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे गट) नेते संजय निरुपम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेचे दहन केले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

काँग्रेसने केलेल्या आरोपानुसार, सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या आत्मचरित्राची पाने आणि पोस्टर्स फाडून संजय निरुपम यांनी त्यांचा अवमान केला आहे. तसेच, निरुपम यांनी महाराष्ट्रात या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या घटनेचे पडसाद राज्यात उमटत असून, अमळनेरमध्येही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

तहसील कार्यालयासमोर तणावाचे वातावरण

आंदोलनाच्या सुरुवातीला तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, शांताराम पाटील, सुलोचना वाघ, मनोज पाटील, भागवत गुरुजी आणि ॲड. रज्जाक शेख यांनी आपली भाषणे व्यक्त करत या घटनेचा निषेध नोंदवला. यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर जमा होत “सोनिया गांधी यांचा अपमान सहन केला जाणार नाही” आणि “संजय निरुपम यांचा धिक्कार असो” अशा घोषणा दिल्या. यावेळी निरुपम यांची प्रतिमा जाळण्यात आल्याने तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या आंदोलनात महेश पाटील, गजेंद्र साळुंखे, लोटन चौधरी, प्रताप पाटील, के. व्ही. पाटील, भिकाजी पाटील, अधिकार पाटील, रोहिदास कापडे, शिंदे, कन्हैयालाल कापडे, सुधाकर भैसे, दिलीप पाटील, प्रकाश सोनवणे, ताराचंद सूर्यवंशी, आर. जे. पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!