ग्राम विकास मंडळाचा सुवर्ण महोत्सव संस्थेच्या गौरवशाली इतिहासाची व भविष्यातील वाटचालीची दिशा ठरेल : माजी मंत्री विजय नवल पाटील

नवलनगर येथे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक संपन्न

​नोव्हेंबर अखेरीस रंगणार भव्य सांगता सोहळा; राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची उपस्थिती लाभणार

​धुळे : स्व. नवल भाऊ व स्व. रुक्मिणी ताई यांच्या प्रेरणेतून लावलेले ग्राम विकास मंडळ रुपी रोपटे आज विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. हा सुवर्ण महोत्सव केवळ उत्सव न राहता संस्थेच्या ५० वर्षांच्या कार्याचा गौरव आणि भविष्यातील वाटचालीची दिशा निश्चित करणारा सोहळा ठरावा, असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन तथा माजी मंत्री विजय नवल पाटील यांनी केले.

​तालुक्यातील नवलनगर येथील ग्राम विकास मंडळ या नामांकित संस्थेला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा, भविष्यातील नियोजन आणि विशेष ‘स्मरणिका’ प्रकाशनाबाबतची बैठक क्रांतिवीर नवल भाऊ कला महाविद्यालयात चेअरमन विजय नाना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी ते कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत होते.

​गुणात्मक शिक्षणावर भर आणि स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिकांचे नियोजन

​कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना नानासाहेब विजय नवल पाटील म्हणाले की, “सध्याचे युग तीव्र स्पर्धेचे असून यामध्ये टिकून राहण्यासाठी गुणात्मक संरचनेत वाढ करणे आवश्यक आहे. वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे.”

​तसेच संस्थेच्या ५० वर्षांच्या दैदिप्यमान इतिहासाचा लेखाजोखा मांडणारी स्मरणिका अत्यंत दर्जेदार व वाचनीय स्वरूपात प्रकाशित करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली. या महोत्सवाची सांगता येत्या नोव्हेंबर अखेरीस भव्य स्वरूपात होणार असून, या सोहळ्यास राज्य मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध तयारी करावी, असे आदेशही त्यांनी दिले.

​संस्थेला ‘अभिमत विद्यापीठाचा’ दर्जा मिळावा : शिक्षकांचे मनोगत

​बैठकीत अनेक शिक्षकांनी आपले विचार मांडले. मनोगत व्यक्त करताना शिक्षक पी. एन. कोळी यांनी, “गेल्या पाच दशकांतील शैक्षणिक योगदान पाहता संस्थेला आगामी काळात अभिमत विद्यापीठाचा (Deemed University) दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,” अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पी. पी. चौधरी, डी. के. पवार, संजय पाटील व प्रा. डॉ. एस. जे. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

​मान्यवरांची उपस्थिती

​या आढावा बैठकीस संस्थेचे चेअरमन माजी मंत्री विजय नाना पाटील, मा. प्रा.श्याम पवार, डी. बी. पाटील, प्रशासकीय अधिकारी संजय पाटील, क्रांतिवीर नवल भाऊ कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एच. उभाळे, प्रा. डॉ. यु. वाय. गांगुर्डे, इंदिरा गांधी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अलकनंदा चव्हाण, पंडित नेहरू सह-शेती विद्यालयाचे मुख्याध्यापक सी. ए. पाटील,शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी पी चौधरी,माजी प्राचार्य डी. के. पवार, आर. एन. भालेराव, किशोर पाटील, मनोहर पाटील यांच्यासह संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. व्ही. एच. उभाळे व उपप्राचार्य डॉ. यु. वाय. गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष पाटील, रोहिदास पाटील, संभाजी पाटील, संजय पवार व रविंद्र धनगर आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!