प्रताप महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा

अमळनेर येथील प्रताप महाविद्यालय आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्री.भाऊसाहेब देशमुख यांनी आपले मत व्यक्त करताना, बोलीभाषेचे महत्त्व सांगून बोलीभाषेतूनच मराठी भाषा समृद्ध झाली आहे असे सांगितले. त्यांनी ज्ञानेश्वरीचे वेगवेगळे संदर्भ देऊन ज्ञानेश्वरीचा परिचय करून दिला. बोलीभाषा आपण जितकी वापरली तितकी मराठी भाषा समृद्ध होते.असे प्रतिपादन केले. मराठी भाषा दिनानिमित्त वि. वा. शिरवाडकर यांचे वाङ्मयीन कार्य विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विजय मांटे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन यातला फरक सांगितला. तसेच मराठी भाषा समृद्ध करायची असेल तर मराठी विषयातले दर्जेदार संदर्भ ग्रंथ वाचली पाहिजेत. समाजासाठी व राष्ट्रासाठी साहित्य महत्त्वाचे आहे. साहित्य वाचल्याने प्रेरणा मिळते. वाचनसंस्कृती जोपासली तर जगणं समृद्ध होते. असे अध्यक्षीय भाषणात सांगितले. यादरम्यान प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.बी. जैन यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी विभागातील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. ज्ञानेश्वर कांबळे यांनी करून दिले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान करून मराठी संस्कृतीचे दर्शन घडविले. मराठी विभागाच्या परिसरात सुंदर रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या, त्यामुळे संपूर्ण वातावरण मराठी संस्कृतीने नटले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठी विभागातील प्रा. प्रतिभा पाटील आणि विद्यार्थी यांनी मेहनत घेतली. मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगेश पाटील यांनी केले तर आभार डॉ. विलास गावीत यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!