प्रतिभा हर्षल पाटील यांची जळगाव ग्रामीण पश्चिम जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस (महासचिव) पदी निवड; अमळनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण!

अमळनेर :  तालुक्यातील सोनखेडी गावच्या माजी सरपंच सौ. प्रतिभा हर्षल पाटील यांची जळगाव ग्रामीण पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीवर जिल्हा महासचिव (सरचिटणीस) पदी निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विशेष मान्यतेने आणि वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. प्रतिभा पाटील यांनी सोनखेडी गावच्या सरपंच म्हणून कार्य करताना लोकहिताची अनेक कामे तडीस नेली असून, त्यांचा तळागाळातील लोकांशी दांडगा संपर्क आहे. त्यांच्या याच संघटन कौशल्याची आणि राजकीय-सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.त्या अमळनेर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष हर्षल जाधव यांच्या अर्धांगणी आहेत.

पक्ष वाढीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प

आपल्या या निवडीबद्दल बोलताना प्रतिभा पाटील यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. आगामी काळात जळगाव ग्रामीण पश्चिम भागात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

​सर्वस्तरांवरून अभिनंदनाचा वर्षाव

प्रतिभा पाटील यांची जिल्हा महासचिव पदी वर्णी लागल्याचे समजताच अमळनेर तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोनखेडी ग्रामस्थांनी आणि स्थानिक महिला आघाडीने या निवडीचे विशेष स्वागत करून आनंद व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!