दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अमळनेर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

अमळनेर: नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष पोलीस लाठीचाराच्या आणि अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी अमळनेर तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी (SDO) यांना निवेदन देऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी २३ जुलै २०२६ रोजी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या आवाहनाला पाठिंबा दर्शवत हे निवेदन देण्यात आले.

विद्यार्थ्यांवरील लाठीचार हा लोकशाहीवर हल्ला

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दि. २० जुलै २०२६ रोजी दिल्लीत सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन करणाऱ्या निष्पाप विद्यार्थी व विद्यार्थिनींवर अमानुष मारहाण करण्यात आली. ज्या देशातील तरुण आणि विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत, त्यांच्यावर लाठीहल्ला करणे हा देशाच्या भविष्यावर आणि लोकशाहीच्या सदविवेकबुद्धीवर झालेला हल्ला आहे. या दुर्देवी घटनेत निष्पाप विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, वंचित बहुजन आघाडी अमळनेरतर्फे या हिटलरशाही सरकारचा आणि पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे.

​वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख मागण्या:

​१. कारवाई व निलंबन: विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे.
२. आर्थिक भरपाई: लाठीचारात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹१० लाख रुपयांची आर्थिक मदत / भरपाई देण्यात यावी.
३. गुन्हे मागे घेणे: आंदोलक विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.
४. अभिव्यक्ती स्वातंत्र्य: देशातील सर्व विद्यार्थ्यांना संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आंदोलनाचा अधिकार अबाधित राखण्याची हमी देण्यात यावी.

निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे अमळनेर तालुकाध्यक्ष दाजीबा गव्हाणे, दीपक सैंदाणे, मोहन बैसाणे, पोपट आप्पा निकम, तुकाराम माळी, भीमराव वानखेडे, मंगलाताई सोनवणे, सिद्धार्थ सोनवणे, किशोर पाटील, प्रविण पाटील, जब्बार शहा, ज्ञानेश्वर नगरराज पारधे (जिल्हा सेक्रेटरी, भाकप), वाल्मिक खैरनार, नारायण सुकलाल खैरनार, पुनमचंद आर. निकम, सोमा संतोष कोळी, निंबा खैरनार यांच्यासह वंचित बहुजन आघाडी व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!