अमळनेर: ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद; तहसीलदारांना निवेदन

अमळनेर : ऑनलाइन फार्मसीच्या माध्यमातून होत असलेल्या बेकायदेशीर औषध विक्रीवर तातडीने बंदी घालावी आणि केंद्र सरकारने कोविड काळात लागू केलेला GSR220(E) आदेश मागे घ्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी अमळनेर तालुका औषध विक्रेता संघाने बुधवारी (दि. २०) एक दिवसाचा कडकडीत बंद पाळला.

​या आंदोलनांतर्गत तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी सकाळी विजय मारुती मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला. ऑनलाइन फार्मसीमुळे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय बंदी असलेली औषधेही सहज उपलब्ध होत असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे. मोर्च्यानंतर तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

               ​रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवा सुरू

बंद काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवेसाठी प्रशासनाकडे संपर्क क्रमांक देण्यात आले होते. शहर व तालुक्यातील २०० हून अधिक औषध विक्रेत्यांनी या बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.

​या वेळी अमळनेर तालुका औषध विक्रेता संघाचे अध्यक्ष प्रशांत पाटील, उपाध्यक्ष निलेश पाटील, सचिव प्रवीण माळी, खजिनदार रवींद्र चौधरी, जिल्हा प्रतिनिधी नरेंद्र पाटील यांच्यासह सुनील छाजेड, मुरलीधर चौधरी, सचिन चोपडा, हर्षल जैन, महेश पवार व मोठ्या संख्येने औषध विक्रेते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!