जळगावात ‘अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटने’ची घोषणा; मुकेश भाऊ साळुंके राष्ट्रीय अध्यक्ष तर दीपकभाऊ खांदे राज्य कार्याध्यक्ष

जळगाव:आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी, सर्वांगीण विकासासाठी आणि वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी अखेर संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी संघटना एकत्र आल्या आहेत. जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्प बचत भवन येथे रविवारी (१७ मे) आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत सर्वानुमते ‘अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटना’ स्थापन करण्याची ऐतिहासिक घोषणा करण्यात आली.

या नवीन संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी श्री. मुकेश भाऊ साळुंके तर महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी श्री. दिपकभाऊ खांदे (सूर्यवंशी) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

आदिवासींच्या हक्कासाठी भव्य चळवळ उभारणार

या बैठकीत आदिवासी समाजासमोरील विविध गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरवर्षी अर्थसंकल्पात आदिवासी समाजासाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद केली जाते, परंतु प्रत्यक्षात समाजाचा विकास झालेला नाही, अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. आदिवासी समाजातील युवक-युवती, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, सांस्कृतिक आणि उद्योग क्षेत्रातील व्यक्तींसह शेतकरी व कष्टकऱ्यांनी या संघटनेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन एक मजबूत चळवळ उभी करण्याचे आवाहन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

संघटनेची मुख्य उद्दिष्टे व संकल्प:

आरक्षणाचे रक्षण: आदिवासी समाजाच्या हक्काच्या आरक्षणात इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यास कडक विरोध करणे.

बोगस आदिवासींना आळा: बोगस जात प्रमाणपत्रे काढून शासकीय नोकऱ्या बळकावणाऱ्यांवर कारवाई करून हक्काच्या रिक्त जागा भरणे.

अन्यायाविरुद्ध लढा: आदिवासी माता-भगिनींवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराला वाचा फोडणे.

मूलभूत हक्क: वन जमिनी कसत असलेल्या आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देणे आणि अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पुरवणे.

आश्रमशाळांमध्ये सुधारणा: आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये होणारी लूट थांबवून तेथील निकृष्ट दर्जाची व्यवस्था सुधारणे.

दिग्गजांची उपस्थिती

या जाहीर घोषणा आणि बैठकीच्या प्रसंगी महाराष्ट्रभरातून आदिवासी समाजाचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:

श्री. भगवान सिंग सोळंके, विनोद भाऊ डाबेराव, सुनील दाभाडे सर, बन्सीलाल पवार, श्री. रमेश साळुंखे, श्री. सुरेश सोनवणे, अंबरसिंग चव्हाण, मोहन भाऊ पारधी, विनोद भाऊ साळुंके, समाधान पवार, चंद्रकांत साळुंके, सतीश चव्हाण, कृष्णा पारधी, दिनेश भाऊ चव्हाण, संगीता चव्हाण, प्रभावती ताई पारधी, चेतना पवार, संजय साळुंके, शामकांत चव्हाण, रामसिंग चव्हाण यांच्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले असंख्य समाजबांधव उपस्थित होते.

‘जय आदिवासी, जय जोहार, जय एकलव्य’ च्या घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले होते.

आदिवासींच्या अस्मितेची आणि हक्काची ही नवीन संघटना भविष्यात समाज परिवर्तनासाठी नेहमी कटिबद्ध राहील, असा विश्वास नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश भाऊ साळुंके यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!