अमळनेर: भारतात डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी आणि लोकांमध्ये या आजाराविषयी व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी १६ मे रोजी ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ पाळला जातो. याच पार्श्वभूमीवर, प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड यांच्या वतीने मारवड गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून डेंग्यू मुक्त गावासाठी संकल्प करण्यात आला. तसेच परिसर स्वच्छता आणि पाण्याचे भांडे झाकून ठेवण्यावर विशेष भर देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

सदर कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी प्रमोद सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीष गोसावी आणि तालुका आरोग्य पर्यवेक्षक प्रशांत फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. मारवड गावातील प्रमुख केंद्रबिंदू असलेल्या शिवाजी चौक येथे समस्त ग्रामस्थांना एकत्रित बोलावून, डेंग्यू जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या विविध म्हणी व माहितीचे स्टीकर लावून ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली.

