अमळनेर : स्थानिक पोदार लर्न स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी आणि पालकांचे अत्यंत अनोख्या आणि उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत चक्क ढोल-ताशांच्या गजरात आणि पालकांच्या उपस्थितीत करण्यात आल्याने मुलांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला.

औक्षण करून प्रवेश
शाळेत पाऊल ठेवताच विद्यार्थ्यांचे औक्षण करून आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या संचालिका तथा मुख्याध्यापिका डॉ अर्चना सूर्यवंशी यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण केले व त्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. पहिल्याच दिवशी झालेल्या या जंगी आणि आपुलकीच्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद ओसंडून वाहत होता.

