अमळनेर :’शिक्षण हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे आणि तो आर्थिक अडचणींमुळे कोणापासूनही हिरावला जाऊ नये,’ हाच उदात्त दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी येथील सरस्वती महाविद्यालयाने एक अत्यंत स्तुत्य आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अंत्योदय अन्न योजनेच्या (AAY) अंतर्गत पिवळे रेशन कार्ड धारक असणाऱ्या एकूण ११२ विद्यार्थ्यांची चालू शैक्षणिक वर्षात संपूर्ण फी माफ करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी यासाठी संस्थेने उचललेले हे पाऊल इतर शैक्षणिक संस्थांसाठी एक आदर्श उदाहरण ठरले आहे.

’शिक्षण ही सेवा’ या तत्त्वाचा प्रत्यय
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांना अनेकदा इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते. हीच अडचण ओळखून संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि प्राचार्य यांनी ‘शिक्षण हे लाभ मिळवण्यासाठी नव्हे, तर सेवा करण्यासाठी असावे’ या सेवाभावी तत्त्वावर विश्वास ठेवून हा क्रांतीकारी निर्णय जाहीर केला.

या योजनेची सुरुवात मागील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्येच झाली होती. तेव्हा बीसीए (BCA) आणि बी.एसस्सी (B.Sc) विभागातील एकूण ७८ विद्यार्थ्यांना संपूर्ण महाविद्यालयीन फी माफ करण्यात आली होती. हाच यशस्वी उपक्रम यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्षात (२०२६-२७) अधिक व्यापक स्वरूपात नियमितपणे राबवला जात असून, यंदा लाभार्थ्यांची संख्या ११२ वर पोहोचली आहे, अशी माहिती महाविद्यालय प्रशासनाकडून देण्यात आली.
एकाच छताखाली नामांकित कोर्सेसची मोठी शृंखला
सरस्वती महाविद्यालय आणि संस्थेच्या विविध शाखांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक काळाची गरज असणारे व्यावसायिक आणि तांत्रिक कोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत. संस्थेमार्फत खालील कोर्सेस यशस्वीरीत्या चालवले जातात:
उच्च शिक्षण (सरस्वती महाविद्यालय): MCA, BCA, B.Sc (AI/ML), B.Sc (Computer/IT), M.Sc (Computer Science), M.Sc (Data Science) यांसारखे माहिती तंत्रज्ञानातील उच्च दर्जाचे कोर्सेस. तसेच पारंपरिक शिक्षणात B.Sc (Plane Science/Chemistry) आणि B.Sc (Microbiology) हे कोर्सेस उपलब्ध आहेत.
कनिष्ठ महाविद्यालय (श्री साई कनिष्ठ महाविद्यालय): येथे ११ वी आणि १२ वी सायन्स (Science) शाखेचे दर्जेदार शिक्षण दिले जाते.
तांत्रिक शिक्षण (ITI): औद्योगिक प्रशिक्षण संस्थेअंतर्गत (ITI) ‘इलेक्ट्रिशियन’ (Electrician) आणि ‘फिटर’ (Fitter) हे रोजगारभिमुख कोर्सेस राबवले जातात.
