बोरखेडा हत्याकांड: नराधम आरोपीला फाशीची शिक्षा; भुसावळ सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!…..सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद ठरला प्रभावी; जळगाव पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाला यश

भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या चार अल्पवयीन भावंडांच्या हत्याकांड आणि बलात्कार प्रकरणातील नराधम आरोपीला भुसावळ सत्र न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल देत फाशीची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच बलात्काराच्या गुन्ह्यासाठी आरोपीला जन्मठेपेची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे.

    या अत्यंत संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या खटल्यात सरकार पक्षातर्फे सुप्रसिद्ध विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. त्यांनी न्यायालयात सादर केलेले पुरावे आणि केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला ही कठोर शिक्षा सुनावली.

तपास अधिकाऱ्यांच्या चोख कामगिरीला यश

    या गुन्ह्याचा तपास अत्यंत कौशल्याने आणि वेगाने पूर्ण करण्यात आला होता. तत्कालीन प्रभारी अधिकारी आणि प्राथमिक तपास अधिकारी रामदास वाकोडे (माजी पोलीस निरीक्षक, रावेर पोलीस ठाणे) यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पुरावे गोळा केले. तसेच, तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सध्याचे यवतमाळचे पोलीस अधीक्षक आयपीएस कुमार चिंता यांनी या प्रकरणाचा सखोल व तांत्रिक तपास केला होता. पोलीस पथकाने सादर केलेल्या भक्कम पुराव्यांमुळेच आरोपीला फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचवणे शक्य झाले.

काय होते बोरखेडा हत्याकांड ?

     रावेर जवळील बोरखेडा शिवारात एकाच कुटुंबातील चार निष्पाप अल्पवयीन मुलांची अत्यंत निर्घृणपणे कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली होती. तसेच यातील पीडितेवर अत्याचारही करण्यात आला होता. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत होता. या घटनेनंतर रावेर पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या.

न्यायालयाच्या निकालाचे सर्वत्र स्वागत

    भुसावळ सत्र न्यायालयाने आरोपीला चौघांच्या खुनाबद्दल फाशी आणि बलात्काराच्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावताच, पीडित कुटुंबाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम, तपास अधिकारी रामदास वाकोडे आणि आयपीएस कुमार चिंता व त्यांच्या संपूर्ण टीमच्या या ‘जबरदस्त कामगिरी’चे आणि तपासाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!