अमळनेरात अधिकारी बनून फसवणूक करणारी टोळी सक्रिय; शून्य बॅलन्समुळे सुदैवाने नागरिक बचावला! सराफ बाजार परिसरातील धक्कादायक प्रकार; भटू विसपुते यांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

अमळनेर : शहरातील सराफ बाजार आणि पान खिडकी परिसरात गुरुवारी संध्याकाळी एका भामट्याने थेट घरात घुसून शासकीय अधिकारी असल्याचे भासवत ऑनलाईन फसवणूक (सायबर फ्रॉड) करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने संबंधित नागरिकाच्या बँक खात्यात शून्य शिल्लक (झिरो बॅलन्स) असल्याने फसवणुकीचा हा डाव फसला. मात्र, या प्रकारामुळे शहरात एकच खळबळबळ उडाली असून नागरिकांनी सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

या संदर्भातील सविस्तर माहिती अशी की, सराफ बाजार, पान खिडकी परिसरातील रहिवासी श्री. भटू आनंदाशेठ विसपुते यांच्या घरी गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती आली. त्याने अंगावर अधिकृत पोषाख परिधान केलेला होता. घरात प्रवेश करून त्याने घरातील वस्तूंची, विजेच्या उपकरणांची चौकशी करण्यास सुरुवात केली आणि कुटुंबप्रमुखांचे नाव विचारले. शासकीय कामासाठी किंवा सर्वेक्षणासाठी हा अधिकारी आला असावा, असा समज करून घरच्यांनी त्याला माहिती दिली. त्यानंतर त्या व्यक्तीने कुटुंबप्रमुखांचा मोबाईल नंबर घेतला आणि तो तिथून निघून गेला.

बनावट मेसेज पाठवून पैसे उकळण्याचा प्रयत्न

काही वेळानंतर त्या अनोळखी व्यक्तीने त्याच मोबाईल नंबरवर कॉल केला. फोनवर बोलताना त्याने आपली जुनी ओळख असल्यासारखे भासवून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. “मी तुमच्या बँक खात्यात २५,५०० रुपये टाकत आहे, ते पैसे तुम्ही मी सांगतो त्या दुसऱ्या नंबरवर पाठवा,” असे त्याने सांगितले.

त्यानंतर काही वेळातच भटू विसपुते यांच्या मोबाईलवर २५,५०० रुपये खात्यात जमा झाल्याचा (क्रेडिट) मेसेज आला. परंतु, विसपुते यांनी बँक खात्याची प्रत्यक्ष तपासणी केली असता, खात्यात कोणतेही पैसे जमा झाले नसल्याचे उघड झाले. तो मेसेज बँकेचा नसून बनावट होता. मुळात संबंधित खात्यात शून्य शिल्लक असल्याने, सायबर भामट्याने खात्यातील पैसे साफ करण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला.

‘वशीम’ आणि ‘अदील’ नावांचा वापर

फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या या भामट्याचा जो मेसेज आला होता, त्यावर ‘वशीम’ असे नाव दिसत होते. तर ज्या नंबरवर पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले होते, त्या व्यक्तीचे नाव ‘अदील’ असे समोर आले आहे. हा सर्व प्रकार ऑनलाईन बँक खाती रिकामी करणाऱ्या संघटित टोळीचा भाग असल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकप्रतिनिधींनी तक्रार दाखल करावी; नागरिकांनी सतर्क राहावे!

“असा फसवणुकीचा प्रकार अमळनेर शहरात किंवा आपल्या परिसरातील कोणत्याही परिवारासोबत होऊ नये, यासाठी नागरिकांना ही पूर्वकल्पना देणे मी माझे कर्तव्य समजतो. शहरात कुठेही असे संशयास्पद अधिकारी किंवा व्यक्ती आल्यास नागरिकांनी तात्काळ सतर्क व्हावे. तसेच या गंभीर प्रकाराची दखल घेऊन आपल्या भागातील लोकप्रतिनिधींनी (नगरसेवक / नगरसेविका) संबंधित पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करावी, जेणेकरून या भामट्यांचा बंदोबस्त करता येईल.”

– भटू आनंदाशेठ विसपुते , सराफ बाजार, अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!