अमळनेर : शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यभर विधानसभा निहाय ‘शिवसंवाद दौरा’ आयोजित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्याचा दौरा आयोजित करण्यात आला असून, शनिवार, दि. ६ जून २०२६ रोजी दुपारी २:३० वाजता अमळनेर येथे हा भव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे.

अमळनेर येथील हॉटेल मिडटाऊन येथे अमळनेर, जळगाव ग्रामीण व चोपडा या तीन विधानसभा मतदारसंघांचा संयुक्त शिवसंवाद कार्यक्रम होणार आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे शिवसैनिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
बलाढ्य नेत्यांची लाभणार उपस्थिती
या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शिवसेना संपर्कमंत्री (धुळे) भाऊसाहेब चौधरी, विभागीय सचिव आनंद परांजपे, माजी खासदार व जळगाव संपर्कप्रमुख आमदार दिलीप मामा लांडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख व विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

विकासकामे व संघटनात्मक बाबींवर होणार मंथन
या शिवसंवाद दौऱ्यामध्ये संबंधित तिन्ही विधानसभा मतदारसंघांचा सविस्तर आढावा घेतला जाईल. मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे, संघटनात्मक कार्य करताना कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी, तसेच आगामी काळातील संघटन बळकटीकरणाबाबत सविस्तर चर्चा करून विविध स्थानिक प्रश्नांवर तात्काळ मार्ग काढण्याचा प्रयत्न या दौऱ्याच्या माध्यमातून केला जाणार आहे.

