अमळनेर : NEET परीक्षेतील कथित घोटाळा आणि पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी ‘राष्ट्रीय विद्यार्थी संघटना’ (NSUI) अमळनेर शाखेच्या वतीने मा. प्रांताधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केले आहे की, NEET परीक्षा ही देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित आहे. मात्र, पेपरफुटीमुळे वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास व मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांवर घोर अन्याय झाला आहे. या गैरप्रकाराचे धागेदोरे महाराष्ट्रातील पुणे व लातूरपर्यंत पोहोचल्याचे समोर आल्यामुळे, संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक, निष्पक्ष आणि कालबद्ध चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे.
NSUI च्या प्रमुख मागण्या:
दोषींना तात्काळ अटक: पेपरफुटी प्रकरणातील सर्व मुख्य सूत्रधार, दोषी आणि संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करून त्यांना तातडीने अटक करावी.
संपूर्ण यंत्रणेची चौकशी: पेपरफुटीत सहभागी व्यक्ती, त्यांना सहकार्य करणारे घटक, पेपर विकत घेणारे विद्यार्थी व पालक, तसेच पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या संपूर्ण साखळीची (यंत्रणेची) सखोल चौकशी व्हावी.
दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई: या प्रकरणाची माहिती असूनही जाणीवपूर्वक डोळेझाक किंवा दुर्लक्ष करणाऱ्यांवर तसेच दोषींना पाठीशी घालणाऱ्यांवरही कायदेशीर बडगा उगारण्यात यावा.
हस्तक्षेपमुक्त तपास: ही चौकशी पूर्णपणे निष्पक्ष, पारदर्शक व वेळेच्या मर्यादेत व्हावी; कोणत्याही राजकीय दबावाला किंवा हस्तक्षेपाला थारा देऊ नये.
विद्यार्थ्यांना न्याय: प्रामाणिक मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक दोषीला कायद्याच्या कक्षेत आणण्यात यावे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासनाने या मागण्यांवर तात्काळ सकारात्मक कारवाई करावी; अन्यथा NSUI तर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा सज्जड इशाराही या वेळी देण्यात आला.
या निवेदनावर NSUI तालुका अध्यक्ष उमेश संदानशिव, शहर अध्यक्ष जयेश सुभाष पाटील यांच्यासह धिरज पाटील, कुणाल कोळी, हरीष महाजन, मनोज पाटील, भागवत सूर्यवंशी, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत, रोहिदास पाटील, महेश दगडू पाटील, शरद पितांबर पाटील, गजेंद्र साळुंखे, प्रताप पाटील, अशोक पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
