जळगाव : जिल्ह्यात बेकायदेशीर अग्निशस्त्रांच्या वाढत्या वापराला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेतंर्गत पोलिसांनी चोपडा परिसरातून दोन आरोपींना शिताफीने अटक केली असून, त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

गोपनीय माहितीच्या आधारे रचला सापळा
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बेकायदेशीर शस्त्रधारकांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. याच दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, उमर्टी गावाकडून कृष्णापूर–मामलदे मार्गे चोपड्याच्या दिशेने दोन संशयित तरुण मोटारसायकलवरून येत असून त्यांच्याकडे बेकायदेशीर शस्त्र आहे.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी या मार्गावर सापळा रचला. संशयित हिरोहोंडा मोटारसायकल (क्रमांक MH-19-S-9450) येताना दिसताच पोलिसांनी ती अडवली आणि त्यावर बसलेल्या दोघांना ताब्यात घेतले.
अटकेतील आरोपी व जप्त मुद्देमाल
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींची नावे खालीलप्रमाणे समोर आली आहेत:
१. राहुल कुवरसिंग पावरा (वय २२, रा. उमर्टी, ता. चोपडा)
२. गणपत प्रभाकर किर्तने (वय २८, रा. असोला जवळ बाजार, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली)
पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत आरोपींकडून १ गावठी पिस्तूल, ५ जिवंत काडतुसे, १ मोटारसायकल आणि २ मोबाईल फोन असा एकूण ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
