अमळनेर: अमळनेर नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या निवडणूक कामाचा प्रलंबित मोबदला अखेर २ जून २०२६ रोजी अदा करण्यात आला. अखिल भारतीय सफाई कामगार काँग्रेसचे प्रदेश सचिव रघुनाथ रामभाऊ मोरे यांनी १७ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी, नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. न्याय्य मागणीची सकारात्मक दखल घेतल्याबद्दल मोरे यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

मात्र, नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी आणि सफाई कर्मचाऱ्यांना अद्यापही या कामाचा मोबदला मिळालेला नाही. निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यात या कर्मचाऱ्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्यांना समान न्याय मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने आरोग्य व सफाई कर्मचाऱ्यांचा प्रलंबित निवडणूक मोबदला तात्काळ अदा करावा, अशी मागणी रघुनाथ रामभाऊ मोरे यांनी केली आहे.

