चोपडा तालुक्यातील माचला येथे वृद्धेचा विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ; ५ जणांविरुद्ध अडावद पोलिसांत गुन्हा दाखल

अडावद (विशेष प्रतिनिधी): चोपडा तालुक्यातील माचला येथे किरकोळ कारणावरून एका ६५ वर्षीय वृद्धेला आणि तिच्या कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करत, घरात डांबून मारण्याची व गावाबाहिर हाकलण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित वृद्धेच्या तक्रारीवरून अडावद पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील आणि गल्लीतील ५ संशयितांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, माचला येथील रहिवासी कमलबाई लक्ष्मण अहिरे (वय ६५) या त्यांचा लहान मुलगा विकास याच्यासह राहतात. त्यांच्या घराशेजारीच संतोष एकनाथ पाटील आणि शिवा एकनाथ पाटील हे आपल्या परिवारासह राहतात. घराच्या मागील जागेच्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता.

अक्षेपार्ह कृत्याला हटकल्याचा राग

​गत १९ एप्रिल २०२६ रोजी आखाजी सणाच्या दिवशी कमलबाई आपल्या घरात जेवण करत असताना, संशयित भोल्या शिवा पाटील हा खिडकीतून थुंकत होता. त्याला जेवताना थुंकू नको असे म्हटले असता, त्याने उद्धटपणे उत्तर दिले. तसेच इतर संशयितांनी बाहेर येत वृद्धेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, सण असल्याने कमलबाई यांनी त्या दिवशी पोलिसांत तक्रार केली नाही.

लोखंडी सळई व काठ्या घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न

​आज दि. २१ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास, कमलबाई, त्यांची मुलगी संगिता आणि जावई प्रशांत संदानशिव हे नातेवाईकांच्या दसक्रिया विधीसाठी जाण्यास निघाले होते. कमलबाई घराला कुलूप लावत असतानाच, जुन्या वादाचा राग धरून संशयित भोल्या शिवा पाटील याने इतर साथीदारांना गोळा केले.

​संशयित शिवा एकनाथ पाटील व संतोष एकनाथ पाटील यांच्या हातात लोखंडी सळई, तर गोविंदा मच्छिंद्र पाटील व भोल्या पाटील यांच्या हातात लाकडी काठ्या होत्या. या सर्वांनी वृद्धेच्या अंगणात बेकायदेशीर प्रवेश करून,

“तु पोलीस स्टेशनला किंवा कुठेही जा, आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही. तु महारीन, धेडगीन जातीची असून जास्त माजली आहेस, हिला मारा आणि हिच्याच घरात डांबून टाका,”

​असे म्हणत अश्लील व जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच “यांना गावाबाहेर हाकलून द्या,” अशी धमकीही दिली.

५ जणांवर गुन्हा दाखल

​या भयंकर प्रकारानंतर भयभीत झालेल्या कमलबाई अहिरे यांनी तात्काळ आपला मुलगा विकास याला बोलावून घेतले आणि अडावद पोलीस स्टेशन गाठले. त्यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी:

१) शिवा एकनाथ पाटील

२) संतोष एकनाथ पाटील

३) भोल्या शिवा पाटील

४) भूषण संतोष पाटील

५) गोविंदा मच्छिंद्र पाटील

(सर्व रा. माचला, ता. चोपडा, जि. जळगाव)

​यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!