अमळनेर / चोपडा :चोपडा तालुक्यातील विरवाडे गावात अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या एका अत्यंत भयावह आणि क्रूर घटनेतील आरोपी अंकेश उर्फ अनिकेश पुन्या बारेला (वय २२, रा. पाटचारी) याला न्यायालयाकडून ‘मरेपर्यंत जन्मठेपेची’ कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात अमळनेरचे सुप्रसिद्ध सरकारी वकील ॲड. किशोर बागुल (मंगरूळकर) यांनी ठोस कायदेशीर पुरावे आणि प्रभावी युक्तिवाद सादर करत आरोपीला त्याच्या कृत्याची पूर्ण शिक्षा मिळवून दिली. या निकालासोबतच ॲड. किशोर बागुल यांनी आपल्या न्यायालयीन कारकिर्दीत तब्बल ७३ वी जन्मठेपेची शिक्षा मिळवून देण्याची ऐतिहासिक व विक्रमी कामगिरी केली आहे.

काय आहे संपूर्ण घटना?
दिनांक ७ सप्टेंबर २०२४ रोजी फिर्यादी यांच्या मुली शेतात निंदणीच्या (खुरपणीच्या) कामासाठी गेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास त्यातील तीन मुली अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत रडत रडत घरी परतल्या. त्यांनी कुटुंबीयांना सांगितले की, आरोपी अंकेश बारेला याने त्यांच्या लहान बहिणीला बळजबरीने शेतात ओढून नेले आहे. या धक्कादायक माहितीनंतर नातेवाईक आणि गावकऱ्यांनी मुलीचा शोध सुरू केला.
पुढील शोधादरम्यान, भगवान गोटू पाटील यांच्या कपाशीच्या शेतात ती निष्पाप पिडीत मुलगी अत्यंत विदारक आणि मृतावस्थेत आढळून आली. तिच्या डोक्यावर गंभीर आणि जीवघेण्या जखमा होत्या, तसेच घटनास्थळावर रक्ताचे सडे पडलेले होते.

