अमळनेर न्यायालयाचा मोठा निकाल! चिमुरडीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला ५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

अमळनेर : घरात एकटी असलेल्या अल्पवयीन मुलीचा हात धरून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी सलमान खान अख्तर खान (वय २८, रा. हमीद नगर, चोपडा) याला न्यायालयाने दोषी ठरवून ५ वर्षे सश्रम कारावास आणि साडेपाच हजार रुपये दंडाची ठोठावली आहे. अमळनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती सी. व्ही. पाटील यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

​काय आहे नेमकी घटना?

​ही घटना १२ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १ ते दीड वाजेच्या सुमारास घडली होती. पीडित मुलीचे आई-वडील घराबाहेर बांधकामाच्या साईटवर मजुरीसाठी गेले होते. लहान भावंडांना सांभाळण्यासाठी पीडित मुलगी घरीच थांबली होती. याचाच फायदा घेऊन शेजारी बांधकामावर काम करणाऱ्या सलमान शेख (खान) याने घरात प्रवेश केला. त्याने लहान बहिणीला बळजबरीने घराबाहेर काढले आणि पीडितेसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली.पीडितेने प्रतिकार करत आरडाओरडा केला, तेव्हा तिची लहान बहीण धावत घरात आली आणि तिनेही बाहेर पळत जाऊन आरडाओरडा सुरू केला. यामुळे घाबरून आरोपी सलमान घटनास्थळावरून पळून गेला. आई-वडील घरी परतल्यानंतर पीडित मुलीने हा धक्कादायक प्रकार त्यांना सांगितला, ज्यानंतर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

​न्यायालयातील कामकाज आणि शिक्षा

​या खटल्याचे कामकाज अमळनेर जिल्हा न्यायाधीश – १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा. श्रीमती सी. व्ही. पाटील यांच्या न्यायालयापुढे चालले. सरकारी वकील ॲड. के. आर. बागुल (मंगरूळकर) यांनी अत्यंत प्रभावी युक्तीवाद केला. त्यांनी एकूण ७ साक्षीदार तपासले. यामध्ये पीडित मुलगी, तिची आई, प्रत्यक्षदर्शी घरमालक आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना पाटील यांची साक्ष आरोपीला शिक्षा मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली.

​आरोपीला सुनावलेली शिक्षा:

​पोक्सो (POCSO) कलम १० अन्वये: ५ वर्षे सश्रम कारावास आणि ५,००० रुपये दंड (दंड न भरल्यास ६ महिने साधी शिक्षा).

​भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३२ (क) अन्वये: ६ महिने शिक्षा आणि ५०० रुपये दंड.

​पोलीस पथकाची कामगिरी

​पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक पवन देसले आणि आण्णासाहेब घोलप यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. न्यायालयात साक्षीदारांची साक्ष सुसंगत आणण्यासाठी पैरवी अधिकारी पी.एस.आय. उदयसिंग साळुंके, पो.हे.कॉ. प्रमोद पाटील, पुरुषोत्तम वाल्डे, राहुल रणधीर, सतीश भोई आणि भरत इशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!