अंमळनेरात जि.प. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या व खोटे दस्तऐवज करून गैरप्रकार केल्याप्रकरणी संशयित योगेश पवार वर गुन्हा दाखल…..

अमळनेर : पंचायत समितीत शासकीय कामकाजात बनावट कागदपत्रे तयार करून गैरप्रकार केल्याप्रकरणी संबंधित संशयित योगेश मोहन पवार ( रा.अमळनेर) याच्याविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नरेंद्र रामसिंग पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपीने जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून तसेच खोटे दस्तऐवज तयार करून तेशासकीय कामकाजात वापरल्याचा गंभीर आरोप आहे.या प्रकारामुळे कार्यालयीन शिस्त व प्रशासनाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता निर्माण झाली होती. 

   तक्रारीनंतर पंचायत समिती स्तरावर प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. चौकशी अहवाल,संबंधित तक्रारी,नोटीस,खुलासे व कागदपत्रांचा सखोल अभ्यास करण्यात आला.त्यामध्ये प्रथमदर्शनी गंभीर स्वरूपाचा गैरप्रकार आढळून आल्याने अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात यापूर्वी संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.खुलासे सादर करण्यात आले असले तरी अहवाल व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सदर बाब अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट झाल्याने फौजदारी कारवाईचा मार्ग अवलंबण्यात आला आहे. 

     या प्रकरणाचा पुढील तपास अमळनेर पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू असून दोषी आढळणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. शासकीय कामकाजात पारदर्शकता, शिस्त कायद्याचे काटेकोर पालन राखण्यासाठी कठोर भूमिका घेतली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!