अमळनेरमध्ये खळबळ: १२ लाखांच्या बिलासाठी ५० हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक जाळ्यात!

अमळनेर : तालुक्यातील नगाव बु. येथील विकासकामांचे बिल मंजूर करून देण्यासाठी ७ टक्के लाचेची मागणी करून ५० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज एका लोकसेवकाला रंगेहात पकडले. या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

तक्रारदार यांच्या चुलत भावाला १५ व्या वित्त आयोगांतर्गत नगाव बु. (ता. अमळनेर) येथे सिमेंट काँक्रीट गटार बांधकाम आणि पेव्हर ब्लॉक बसवणे अशी एकूण १२,००,००० रुपयांची दोन कामे मिळाली होती. या कामांचे बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात संबंधित लोकसेवकाने ७ टक्के प्रमाणे ८४,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

फोन-पे वर आधीच घेतले होते १३ हजार

तक्रारदाराने दि. ३० एप्रिल २०२६ रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता धक्कादायक बाब समोर आली. संबंधित लोकसेवकाने मागणी केलेल्या एकूण लाचेपैकी १३,००० रुपये यापूर्वीच ‘फोन-पे’ (PhonePe) द्वारे स्वीकारल्याचे पंचांसमक्ष मान्य केले.

केले नगरमधील राहत्या घरी कारवाई

तडजोडीअंती ५०,००० रुपये देण्याचे ठरले होते. आज अमळनेर शहरातील केलेनगर भागातील आपल्या राहत्या घरी ही लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून संबंधित लोकसेवकाला रंगेहात ताब्यात घेतले. सध्या अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कारवाई करणारे पथक:

ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावच्या वतीने करण्यात आली.

पर्यवेक्षण अधिकारी: श्री. योगेश ठाकूर (पोलीस उप अधीक्षक)

सापळा अधिकारी: श्री. हेमंत नागरे (पोलीस निरीक्षक)

तपास अधिकारी: श्रीमती स्मिता नवघरे (पोलीस निरीक्षक)

सापळा पथक: दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, बाळू मराठे, किशोर महाजन, सुनील वानखेडे, भूषण पाटील, मनोज पाटील, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी आणि सचिन चाटे.

      भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!