अमळनेर शहर प्रतिनिधी,शहरातील गांधलीपुरा भागात बोरी नदीवर बांधण्यात आलेला पूल सध्या प्रशासकीय नियोजनशून्यतेचा आणि जनतेच्या पैशांच्या अपव्ययाचा जिवंत नमुना बनला आहे. या पुलाच्या बांधकामात झालेल्या अनियमिततेची तांत्रिक चौकशी करावी आणि हा पूल तातडीने वाहतुकीसाठी सुरू करावा, या मागणीसाठी आम आदमी पार्टी (AAP) तालुका अमळनेर च्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद अमळनेर यांना तहसीलदार यांच्यामार्फत जाहीर तक्रार व निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे ‘आप’ने प्रशासनाचे लक्ष वेधत गंभीर आक्षेप नोंदवले आहेत.

निवेदनातील मुख्य मुद्दे आणि आक्षेप:
निधीचा प्रचंड अपव्यय: माजी आमदार साहेबराव दादा पाटील यांच्या कार्यकाळात या पुलासाठी लाखो-करोडो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, पुलावरून पुढे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही. रस्ता नसताना जनतेच्या कष्टाचा पैसा अशा पद्धतीने का उधळला गेला? असा संतप्त सवाल निवेदनात करण्यात आला आहे.
सरकारी मालमत्तेची चोरी: पूल वापराविना पडून असल्यामुळे येथील लोखंडी बॅरिकेड्स आणि महागड्या ग्रिलची सर्रास चोरी होत आहे. सरकारी मालमत्तेचे होणारे हे नुकसान थांबवण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तांत्रिक मंजुरीवर प्रश्नचिन्ह: पुलाच्या पुढील जोड रस्त्याचा (अॅप्रोच रोड) विचार न करताच या पुलाला तांत्रिक मंजुरी कशी देण्यात आली? मंजुरी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी ‘आप’ने केली आहे.

“रस्ता नसताना पूल बांधणे हा नियोजनशून्यतेचा कळस आहे. या संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी आणि हा पूल त्वरित जनतेसाठी खुला करण्यात यावा, अन्यथा आम आदमी पार्टी तीव्र आंदोलन छेडेल.”
— आम आदमी पार्टी, अमळनेर पदाधिकारी.
