अमळनेर शेतकरी संघ निवडणूक: १११ उमेदवारांची माघार, ४४ शिलेदार रिंगणात! महायुती विरुद्ध काँग्रेस पॅनलमध्ये चुरस

    अमळनेर शहर प्रतिनिधी, सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची संस्था असलेल्या ‘अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ लि.’ च्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीची (सन २०२५-३०) रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १११ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे आता ६ वेगवेगळ्या मतदार संघांतून एकूण ४४ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत.

    या निवडणुकीत एका बाजूला खासदार श्रीमती स्मिता वाघ आणि विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वाखालील तगडे पॅनल मैदानात उतरले आहे, तर दुसऱ्या बाजूला तालुका काँग्रेस पक्षानेही आपले स्वतंत्र पॅनल उभे केल्याने लढत अत्यंत चुरशीची बनली असून पॅनल प्रमुखांचा कस लागणार आहे.

माघारीनंतर मतदारसंघनिहाय अशी आहे अंतिम स्थिती:

१ व्यक्तीशः मतदारसंघ : (मंजूर अर्ज ६८) (माघारी घेतलेले अर्ज ५०) (रिंगणात शिल्लक उमेदवार१८)

२ सोसायटी मतदारसंघ : (मंजूर अर्ज ३६) (माघारी घेतलेले अर्ज २६) (रिंगणात शिल्लक उमेदवार १०)

३ महिला प्रतिनिधी : (मंजूर अर्ज १६)(माघारी घेतलेले अर्ज ११ ) (रिंगणात शिल्लक उमेदवार ५)

४ इ.मा.व. (OBC) : (मंजूर अर्ज १९ ) (माघारी घेतलेले अर्ज १५ ) (रिंगणात शिल्लक उमेदवार ४)

५ अनु. जाती / जमाती (SC/ST ) : (मंजूर अर्ज ६ ) (माघारी घेतलेले अर्ज २ ) (रिंगणात शिल्लक उमेदवार ४)

६ वि.जा.भ.ज. व विमाप्र (VJNT/SBC): (मंजूर अर्ज १० ) (माघारी घेतलेले अर्ज ७ ) (रिंगणात शिल्लक उमेदवार ३)

  एकूण : (मंजूर अर्ज १५५) (माघारी घेतलेले अर्ज १११) (रिंगणात शिल्लक उमेदवार ४४)

पॅनल प्रमुखांची प्रतिष्ठा पणाला!

   अमळनेर तालुक्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राच्या दृष्टीने या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. महायुतीचे नेते आमदार अनिल पाटील आणि खासदार स्मिता वाघ यांनी या निवडणुकीत आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर दुसरीकडे, काँग्रेस पक्षाने दिलेल्या आव्हानामुळे ही निवडणूक तिरंगी आणि चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे.

सर्वात जास्त चुरस ‘व्यक्तीशः’

 मतदारसंघात (१८ उमेदवार) आणि ‘सोसायटी’ मतदारसंघात (१० उमेदवार) पाहायला मिळत आहे. आता अर्ज माघारीची मुदत संपल्याने तिन्ही बाजूंच्या पॅनल प्रमुखांनी मोर्चेबांधणी आणि प्रचार यंत्रणा गतिमान केली असून, शेतकरी संघावर कोणाची सत्ता येणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!