शहराच्या विकासासाठी विरोधकांनी सहकार्य करावे; माजी आमदार शिरीष चौधरींचे आवाहन

      अमळनेर: शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी विरोधकांनी राजकारण बाजूला ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन माजी आमदार तथा शिवसेना नेते शिरीष चौधरी यांनी केले आहे. अमळनेर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या महत्त्वपूर्ण ठरावांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, अपक्ष गट नेते महेश देशमुख यांच्यासह विविध समिती सभापती व नगरसेवक उपस्थित होते.

​पाणीपुरवठ्यात अडथळा आणणाऱ्यांवर फौजदारी कारवाई

शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत करण्यामागे काही विरोधक आणि नगरपालिकेचे कर्मचारी संगनमत करत असल्याचा खळबळजनक आरोप चौधरी यांनी केला. ते म्हणाले की:

पाणीपुरवठा सध्या चार दिवसांआड असून तो लवकरच एक दिवसाआड करण्याचा आमचा मानस आहे.

सन २०१४ मध्ये ५ लाख लिटरचा साठा होत होता, जो आता २-३ लाखांवर आला आहे. यात दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील.

शहरात ७० टक्के पाण्याची चोरी होत आहे. अवैध नळ कनेक्शन नियमित करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे, अन्यथा कठोर कारवाई होईल.

पाणीपुरवठा सुधारण्यासाठी शहरात तीन नवीन पाण्याच्या टाक्या आणि बंद असलेले १० बोअर पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.

विकासकामांचा धडाका: नमो गार्डन अन् विठ्ठल मूर्ती

शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि सोयींसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले:

नमो गार्डन: शहरात १ कोटी रुपये खर्चून भव्य ‘नमो गार्डन’ उभारले जाणार आहे.

विठ्ठल मूर्ती: अमळनेर ही संतांची भूमी असल्याने नदीकाठावर २१ फुटी विठ्ठल मूर्ती स्थापन केली जाईल.

अजितदादा पवार स्मारक: शहरात लोकनेते स्व. अजितदादा पवार यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरोग्य: नगरपालिकेच्या माध्यमातून १०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारले जाणार आहे.

कर सवलत आणि स्वच्छतेवर भर

मालमत्ता धारकांसाठी दिलासादायक घोषणा करताना त्यांनी सांगितले की, मालमत्ता हस्तांतरण शुल्क केवळ १ टक्का आकारले जाईल. तसेच, वेळेवर घरपट्टी भरणाऱ्यांना १ टक्का करमाफी दिली जाईल. शहरातील कचरा संकलनाबाबत वाढत्या तक्रारी पाहता, संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट (काळ्या यादीत) टाकण्याची प्रक्रिया सुरू केली असून स्वच्छतेवर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

“शहराचा विकास हेच आमचे ध्येय आहे. राजकारण निवडणुकीपुरते मर्यादित ठेवून विकासकामात सर्वांनी हातभार लावावा.”

— शिरीष चौधरी (माजी आमदार)

या पत्रकार परिषदेला नगरसेवक बबलू महाजन, कैलास पाटील (पाणी पुरवठा सभापती), नावेद शेख (शिक्षण सभापती), गुलाब पाटील (स्वीकृत नगरसेवक), साहेबराव पवार (बांधकाम सभापती), रामकृष्ण पाटील (आरोग्य सभापती),स्वाती सूरज परदेशी(महिला व बाल कल्याण सभापती ) यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!