विशेष लेख…….
पावसाळा सुरू झाला की निसर्ग बहरतो, पण याच पावसामुळे बिळांमध्ये पाणी शिरल्याने सापांचा मानवी वस्तीतील वावर वाढतो. घरात किंवा शेतात अचानक ‘नागफणा’ समोर उभा ठाकला की काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. अशा आणीबाणीच्या वेळी ‘देवा’सारखा धावून येतो तो म्हणजे सर्पमित्र. स्वतःचा जीव तळहातावर घेऊन इतरांचे प्राण वाचवणाऱ्या या जिगरबाज तरुणांच्या नशिबी मात्र शासन दरबारी केवळ उपेक्षाच आली आहे.

सर्पमित्र कोणत्याही मानधनाची किंवा फळाची अपेक्षा न ठेवता भर पावसात, मध्यरात्रीही एका फोनवर धावून येतात. मात्र, हे धाडसी काम करताना त्यांच्याकडे साधे हातमोजे किंवा दर्जेदार ‘स्टिक’ (हुक) सारखी सुरक्षा साधनेही नसतात. केवळ अनुभवाच्या आणि कौशल्याच्या जोरावर ते मृत्यूला गवसणी घालत असतात. दुर्दैवाने, एखादा वार उलटला आणि सर्पदंश झाला, तर त्यांच्या पाठीशी उभे राहायला ना शासन आहे, ना कोणती विमा कंपनी.
सर्पदंशामुळे एखाद्या सर्पमित्राला अपंगत्व आल्यास किंवा त्याचा मृत्यू ओढवल्यास संबंधित कुटुंब पूर्णतः उघड्यावर पडते. सर्पमित्रांसाठी कोणतीही शासकीय विमा योजना लागू नाही.आधुनिक साहित्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. स्वखर्चाने महागडे साहित्य घेणे अनेकांना परवडत नाही, परिणामी अपघातांची तीव्रता वाढते.साप पकडल्यानंतर मिळणारी थाप तात्पुरती असते, पण भविष्यातील अंधाराचे काय? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
”सर्पमित्र हे केवळ साप पकडणारे ‘गारुडी’ नसून ते पर्यावरणाचे रक्षक आहेत. वन्यजीव कायद्यांतर्गत सापांना संरक्षण दिले जाते, मग त्या सापांना वाचवणाऱ्या मानवी हातांना संरक्षण का नाही? सरकारने सर्पमित्रांना ओळखपत्र, विमा संरक्षण आणि सुरक्षा साधने पुरवणे काळाची गरज आहे.” — प्रा. डॉ. विजय गाढे, अमळनेर.
