अमळनेर:खान्देशच्या मातीतील कलेचा सुगंध आता सातासमुद्रापार दरवळणार आहे. अमळनेरचे सुप्रसिद्ध युवा गायक आणि अवघ्या २१ वर्षांचे रॉकस्टार स्वामी तोलानी व ज्येष्ठ गायक हरी तोलानी यांची आंतरराष्ट्रीय संगीत कार्यक्रमासाठी सिएरा लिओन (आफ्रिका) येथे निवड झाली आहे. या दौऱ्यामुळे अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

विविध कार्यक्रमांची मेजवानी
सोमवार, १६ मार्च ते मंगळवार, २४ मार्च २०२६ या कालावधीत आफ्रिकेतील सिएरा लिओन येथे हे विशेष कार्यक्रम रंगणार आहेत. या दौऱ्यात भारतीय संस्कृती आणि संगीताची झलक पाहायला मिळणार आहे. यात प्रामुख्याने:
बॉलिवूड नाईट: हिंदी चित्रपटसंगीताचा धमाका.
भजन संध्या व माता की चौकी: आध्यात्मिक सुरांचा जागर.
चेट्रीचंड्र सिंधी महोत्सव: सिंधी नववर्षाचा विशेष बहारदार कार्यक्रम.
अमळनेरची टीम सज्ज
स्वामी तोलानी आणि हरी तोलानी यांच्यासोबत अमळनेरचे नामवंत कलाकार नितीन गुरव आणि जयेश संदानशिव हे देखील वाद्यवृंदाची साथ संगत करणार आहेत. एकाच शहरातील चार कलाकार आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कला सादर करणार असल्याने शहरासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.
”अमळनेरच्या कलाकारांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळणे ही आनंदाची गोष्ट आहे. स्वामी आणि हरी तोलानी यांच्या माध्यमातून खान्देशचा आवाज आफ्रिकेत गुंजणार आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”
— मित्र परिवार व रसिक प्रेक्षक, अमळनेर.
