मनाचा मेगॅब्लॉक !!!…..

 

उमराव जान या चित्रपटात रेखा एक गज़ल म्हणते, त्यात शब्द आहेत – तमाम उम्र का हिसाब मांगती है जिंदगी….

थोडक्यात आजवर घालवलेल्या आयुष्याचा, जीवन आता हिशोब मागतंय! आणि पुढे ती खिन्नपणे म्हणते – त्याला सांगण्यासारखं फारसं काही माझ्याकडे नाही, त्यामुळे माझी मान शरमेनं खाली झुकते !

अगदी अचानक अकल्पित मृत्यू ज्यांना गाठतो, असे काही भाग्यवान लोक सोडले, तर जे जीवनाच्या उत्तरार्धात मृत्यूची वाट पाहतात, त्यांना या प्रश्नाला सामोरं जावंच लागतं,कि आपल्या एकूण जीवनाची गोळाबेरीज काय ?

जे आपल्याजवळ असतं, त्याची किंमत मनुष्याला कधीच समजत नाही.

हातात असलेला काळ, खिशात असलेला पैसा,तुमच्यावर जीव ओवाळून टाकणारे जीवलग,सहज मिळणारा सन्मान, लागणारी शांत झोप, न कुरकुरता हवे ते काम करणारं शरीर, कडकडून लागणारी भूक,चित्ताची शांतता आणि अशा ब-याच गोष्टी.
यातली एकही गोष्ट जेव्हा हातातून निसटून जाते, तेव्हा मनुष्याचा प्राण त्या अभावाने कासावीस व्हायला लागतो.

मग आजवर जे आयुष्य बेहिशेबी जगलो,त्याचा हिशोब मन स्वतःशीच मांडायला लागतं.

या जगात काहीही घट्ट धरून ठेवता येत नाही.तुम्हाला हवेहवेसे वाटणारे क्षण,प्रेमळ माणसं, अगदी हाताच्या तळव्यावर घेतलेलं थोडंसं पाणी, हे सारं पाहता पाहता घरंगळून जातं, मागे रितेपणाचा संस्कार स्मृतीत ठेवून !

भाऊसाहेब पाटणकर त्यांच्या एका मराठी गज़लेत म्हणतात
सारे मला विसरोत,त्याचे वाईट ना वाटे मला !
वाटते वाईट, त्यांना विसरता ये ना मला !!

किती विचित्र अवस्था आहे.

अशा व्यक्ती, असे प्रसंग, असे दशकानुदशकांचे कालखंड आपण आठवताना मनात खोलवर याची जाणीव सतत बोचत राहते, कि एखाद्या जुगा-याने पैसे उडवावेत, तसा अत्यंत मौल्यवान काळ मी निरर्थक उडवला.
पैसा पुन्हा मिळवता येईल, पण एकदा हातून निसटून गेलेला काळ? कालचक्र उलटे फिरवणारा कोणी या जगात आजवर जन्माला आला नाही.

ही मनाची होणारी घालमेल हा मनाचा एक मेगॅब्लॉकच नाही का ?
अशा मेगॅब्लॉकला सामोरे जाताना पर्यायी मार्ग विचारात घ्यावा लागतो.आजवर जे झाले, ते झाले, पण इथून पुढे नाही !
हे निग्रहाने ठरवावे लागते.

आपला खराखुरा आनंद ज्यात आहे, त्यासाठी बाकी सारे निरर्थक क्रियाकलाप बाजूला ठेवून वेळ काढावा लागतो.

काही वाचणं राहून गेलेलं असतं, काही सुंदर पहायचं राहिलेलं असतं, काही सुरेल रचना पुन्हा पुन्हा ऐकायच्या असतात, स्वतःतच हरवून जायचं राहिलंय,ज्यांचं नुसतं स्मरण झालं, तरी कपाळावर आपोआप एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेने आठ्या याव्यात,अशा लोकांनी व्यापलेल्या स्मृती कायमच्या विसर्जित करून मनाचे दुखरे कप्पे रिकामे करायचे असतात, हे सारे करण्यासाठी वेळेचा खूप सदुपयोग करता येतो.

तुम्ही कुठे जखडून पडलात तर काळ दुःख देतो, तुम्ही सोडून द्यायला लागलात, तर काळ तुम्हाला एखाद्या देवकपाशीतल्या हलक्या बी सारखं तरलतेनं तरंगण्याचा आनंद देतो.

कुठेच जायचे नाही, काही व्यवधान नाही, कशाचीही बांधिलकी नाही, फक्त ” असण्यातला ” आनंद मनमुराद घ्यायचा.
मन त्या देव कापसाच्या बी पेक्षा जास्त हलकं होवून कसं तरंगतं, हे एकदा अनुभवलं, तर त्यापुढे बिलियन डॉलरची कल्पनाही गळून पडेल.
भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात पायाला चिखल लागला, तर थोडा वेळ फक्त शांत बसा, त्यातला ओलावा संपला, की चिखलाचे पोपडे पडतात, काही प्रयत्न न करता पाय स्वच्छ होतो.
क्षणभंगुर गोष्टींबद्दल मनात असलेला निरर्थक ओलावा मनुष्याला जखडून ठेवतो, तोच मनाचा मेगॅब्लॉक आहे.

फक्त ” मी ” चं असणं अनुभवताना काळही थबकतो.

त्याला स्वतःच अस्तित्व नाही, असं जे.कृष्णमूर्ति म्हणतात.

तुमच्या मनाच्या आश्रयानेच काळ राहतो.

मन एकदा मेगॅब्लॉक मधून निसटलं, कि काळाच्या कैदेतून कायमची सुटका! यालाच मोक्ष म्हणत असावे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!