अमळनेर: शहरातील ढेकू रोडवरील जिजाऊ नगर परिसरात अमळनेर नगरपालिकेच्या नियोजनशून्य आणि निष्काळजी कारभारामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या २० ते २५ दिवसांपासून या भागातील पाणीपुरवठा खंडित झाला असून, प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पाईपलाईन खोदली, कनेक्शन तोडले!
मिळालेल्या माहितीनुसार, जिजाऊ नगर भागात पाणीपुरवठ्याची पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली खोदून ठेवण्यात आली आहे. मात्र, हे काम अर्धवट स्थितीत असल्याने अनेक घरांचे नळ कनेक्शन तोडले गेले आहेत. तब्बल तीन आठवड्यांपासून नळांना पाणी नसल्याने गृहिणींना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
एकीकडे पाणी येत नाही, तर दुसरीकडे ज्या भागात पाणीपुरवठा होतोय, तिथे गढूळ आणि दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या दूषित पाण्यामुळे परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली असून, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्रशासनाचे ‘ढिम्म’ धोरण
स्थानिक रहिवाशांनी या समस्येबाबत लक्ष्मी नगर येथील पाणी टाकीवरील कर्मचाऱ्यांशी वारंवार संपर्क साधला. मात्र, “आज करू, उद्या करू” अशी उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार सूचना देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
नागरिकांची मागणी:
“प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन पाईपलाईनची दुरुस्ती करावी. तोडलेले कनेक्शन पुन्हा जोडून शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा ढेकू परिसरातील संतप्त रहिवाशांनी दिला आहे.
