अमळनेर: शहराच्या सांस्कृतिक प्रतिष्ठेला काळीमा फासणारा प्रकार ताडेपुरा सार्वजनिक स्मशानभूमीत समोर आला आहे. येथील अंत्यविधी बेडची झालेली दुरवस्था आणि अपूर्ण कामांमुळे मृतदेहांची अवहेलना होत असल्याचा धक्कादायक अनुभव आल्यानंतर, नगरपरिषदेचे आरोग्य समिती माजी सभापती शाम जयवंतराव पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रकरणी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले असून माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याशीही फोनवरून चर्चा केली.

नेमका प्रकार काय?
२४ मार्च २०२६ रोजी एका निकटवर्तीयांच्या अंत्यविधीसाठी शाम पाटील ताडेपुरा स्मशानभूमीत गेले असता, तेथील विदारक परिस्थिती समोर आली:
बेडची दुरवस्था: जुन्या शेडखालील तिन्ही अंत्यविधी बेडचे कठडे तुटलेले असून त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे.
अपूर्ण काम: नवीन शेडचे काम अद्याप अपूर्ण आहे. विशेष म्हणजे या नवीन कामात अंत्यविधी बेडची तरतूद नसल्याचे दिसून आले.
तात्पुरती व्यवस्था: बेड उपलब्ध नसल्याने दोन अंत्यविधी लोखंडी सळई आणि तारांच्या साहाय्याने तात्पुरता बेड तयार करून करावे लागले. यामुळे मृताच्या नातेवाईकांना आणि कर्मचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
प्रशासकीय उदासीनता आणि तांत्रिक वाद
या परिस्थितीबाबत कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, नगरपरिषद आणि संबंधित कामाचा मक्तेदार (कॉन्ट्रॅक्टर) यांच्यात किरकोळ तांत्रिक वाद सुरू असल्याची माहिती मिळाली. या तांत्रिक वादामुळे सामान्य नागरिकांना मात्र अंत्यसंस्कारासारख्या कठीण प्रसंगी वेदनादायी अनुभवाला सामोरे जावे लागत आहे.
शाम पाटील यांनी तातडीने शिवसेना (शिंदे गट) नेते तथा माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. नगरपरिषद आणि मक्तेदार यांच्यातील समन्वय घडवून आणून हे काम तातडीने मार्गी लावण्याची विनंती त्यांनी केली. हिंदू धर्माच्या परंपरेनुसार अंत्यविधी सन्मानाने होणे गरजेचे असून, प्रशासनाने यात तत्काळ लक्ष न दिल्यास शहरवासीयांच्या भावना तीव्र होतील, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी निवेदन देताना शाम पाटील यांच्यासोबत अक्षय चव्हाण, हर्षल महाजन, उज्वल मोरे आदी उपस्थित होते.
”स्मशानभूमीतील ही परिस्थिती शहराच्या प्रतिष्ठेला न शोभणारी आहे. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार प्रशासनाने थांबवून तातडीने सोयीसुविधा पूर्ण कराव्यात.”
— शाम जयवंतराव पाटील (माजी सभापती, आरोग्य समिती)
