मुंबई : ‘दैनिक जनप्रवास’चे समूह संपादक आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट सांगली पोलिसांनी यशस्वीपणे उधळून लावला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय भोकरे यांना तातडीने राज्यभर पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. “भोकरे यांचे पत्रकारिता, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान मोलाचे असून, अशा व्यक्तींची सुरक्षा करणे हे सरकारचे कर्तव्य आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.

नेमकी घटना काय?
(रेकी करून हत्येचा प्रयत्न)
सांगली पोलिसांनी या प्रकरणी तीन संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तूलं, चार जिवंत काडतूसं आणि इतर घातक शस्त्रे जप्त केली आहेत. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, हे आरोपी गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून संजय भोकरे यांची ‘रेकी’ (पाळत ठेवणे) करत होते. अंबाबाई तालीम संस्थेच्या जमिनी हडपण्याच्या उद्देशातून हा सर्व प्रकार सुरू असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या कारवाईनंतर मुख्य आरोपींकडून ‘प्लॅन बी’ नुसार पुन्हा हल्ला होण्याची दाट शक्यता स्वतः संजय भोकरे यांनी व्यक्त केल्याने संपूर्ण भोकरे कुटुंब सध्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या निशाण्यावर असल्याचे दिसत आहे.

