अंबरनाथ : नेपाळमधील काठमांडू येथे संपन्न झालेल्या ‘४ थ्या माऊंट एव्हरेस्ट आंतरराष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२६’ (4th MT. Everest Int’l Taekwondo Championships) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मेघाना शशिकांत पाटील यांनी दैदिप्यमान कामगिरी केली आहे. त्यांनी कांस्यपदक (Bronze Medal) पटकावून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा फडकवला असून आई – वडिलांसह देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.

नेपाळ तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने १७ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत जगातील जवळपास 15 देशांमधील नामवंत खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत मेघाना पाटील यांनी ‘सिनियर क्युरोगी फिमेल’ (Senior Kyrougi Female) ६२ किलो वजनी गटात आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करत कांस्यपदकावर नाव कोरले.
कु मेघाना पाटील या अंबरनाथ येथील ‘फाईट बॅक तायक्वांदो अकॅडमी’च्या (Fight Back Taekwondo Academy) खेळाडू आहेत. त्यांना त्यांचे प्रशिक्षक आदित्य जारांडे (Coach Aditya Jarande) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मेघाना यांची जिद्द, कठोर मेहनत आणि प्रशिक्षकांचे अचूक तंत्र यांच्या जोरावर त्यांनी हे आंतरराष्ट्रीय यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल बोलताना प्रशिक्षक आदित्य जारांडे यांनी सांगितले की, “मेघानाने गेल्या अनेक महिन्यांपासून या स्पर्धेसाठी तयारी केली होती. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पदक मिळवणे ही आमच्या अकॅडमीसाठी आणि शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
कु मेघाना पाटील हिचे वडील शशिकांत पाटील (मुळगाव -चाळीसगाव )हे पोलीस विभागात हेड कॉन्सटेबल म्हणून कर्तव्य बाजावत आहेत.त्यांच्या धर्म पत्नी सौ हर्षदा यांनी आपल्या दोघी मुलींना शिक्षणासाठी सदैव प्रोत्साहन दिल्याने त्या आपल्या क्षेत्रात उतुंग भरारी घेत आहेत.
कु मेघना हिच्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुबंई चे खान्देश उपाध्यक्ष प्रा डॉ विजय गाढे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत तसेच सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी मोठी प्रेरणा मिळाली आहे.
