🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳 प्रजासत्ताक दिन आणि संविधान ! ***शिवश्री निंबा पाटील✍🏻

🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
प्रजासत्ताक दिन आणि संविधान !*

शिवश्री निंबा पाटील✍🏻

२६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन, गणराज्य दिन आणि भारतीय संविधान लागू होण्याचा दिवस. याच दिवसापासून भारत खऱ्या अर्थाने संविधानानुसार चालायला लागला आणि लोकशाही प्रस्थापित झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास अडीच वर्षानंतर संविधानाच्या नियमानुसार देशाचा राज्यकारभार सुरू झाला. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ६ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेची स्थापना झाली आणि ९ डिसेंबर १९४६ ला संविधान सभेची पहिली बैठक झाली होती. संविधान सभेत एकूण ३८९ सदस्य होते आणि विविध प्रकारच्या तेरा समित्या होत्या. जवळपास तीन वर्षापर्यंत सविधान सभेचे कामकाज चालले. या काळात ज्या विद्वानांनी काम केले आणि संविधान निर्मितीसाठी प्रचंड मेहनत घेतली त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे संविधानरुपी स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. विविध जाती, पंथ, धर्म, भाषा असलेल्या देशात सर्वांच्या भावनेचा आदर करून व सर्वांना समान हक्क आणि अधिकार मिळतील अशा पद्धतीचे सर्वसमावेशक संविधान तयार करणे एवढी सोपी गोष्ट नव्हती. त्यामुळे संविधान सभा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समिती यांच्या सदस्यांमध्ये अभ्यासपूर्ण चर्चा, वादविवाद, मते-मतांतरे, शेकडो दुरुस्त्या यानंतर आपले संविधान तयार झाले.

संविधान लागू होऊन आज ७५ वर्ष पूर्ण होत आलेले आहे. या ७५ वर्षात संविधानाची किती आणि कशी अंमलबजावणी झाली यावर वेळोवेळी चर्चा होत असते. परंतु या संविधानाने देशातील कोट्यावधी नागरिकांना स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव करून दिली हे मात्र नक्की. संविधान राबविण्याची जबाबदारी ज्या लोकांवर आहे ते जर प्रामाणिक नसले तर संविधान चांगले जरी असले तरी सुद्धा ते प्रभावी ठरू शकणार नाही असे संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेतील आपल्या शेवटच्या भाषणात सांगितले होते. बाबासाहेबांच्या या महत्त्वपूर्ण विधानाची आपल्याला वेळोवेळी आठवण होत असते. राज्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असो; ते आपल्या पक्षाच्या विचारानुसार संविधानाला वाकविण्याचा, झुकविण्याचा प्रयत्न करीत असतात. आपल्या सत्तेमध्ये संविधानाची आडकाठी कशी येणार नाही याची काळजी प्रत्येक राज्यकर्ता घेत असतो. त्यामुळे संविधानात वेळोवेळी दुरुस्त्या सुद्धा झालेल्या आहेत. काही दुरुस्त्या लोकांसाठी होत्या तर काही दुरुस्त्या राज्यकर्त्यांच्या हितासाठी होत्या. काही दुरुस्त्यांमुळे लोकांना फायदा झाला तर काही दुरुस्त्यांमुळे नुकसान झाले. त्यामुळे संविधान जर लोकांसाठी आहे तर त्यामध्ये होणारे बदल सुद्धा १०० टक्के लोकांसाठीच असले पाहिजे असे जेव्हा या देशातील राज्यकर्त्यांना वाटेल तेव्हाच खऱ्या अर्थाने संविधान हे पूर्णपणे जनतेसाठी राबविल्या जात आहे असे म्हणता येईल.

त्यामुळे गणराज्य दिनाच्या निमित्ताने संविधानाचे महत्त्व सुद्धा जनतेच्या लक्षात आणून देणे अत्यंत आवश्यक आहे. संविधान लागू झाल्यामुळे भारत हा गणराज्य म्हणजे लोकांचे राज्य असलेला देश ठरला. संविधान लागू होई पर्यंत भारत गणराज्य किंवा प्रजासत्ताक राज्य नव्हते. त्यामुळे २६ जानेवारीला संविधानाचे महत्त्व तेवढ्याच जोरकसपणे विशद करणे आपली जबाबदारी आहे. संविधानामुळे गरिब आणि श्रीमंतांना समान मताधिकार मिळाला. त्यामुळे दर पाच वर्षांनी लोकप्रतिनिधी निवडण्याचे अधिकार संविधानामुळे आपल्याला प्राप्त झाले. याशिवाय अनेक हक्क आणि अधिकार २६ जानेवारी १९५० पासून भारतवासीयांना मिळाले जे पूर्वी नव्हते. हे हक्क आणि अधिकार ज्या २६ जानेवारीला प्राप्त झाले तो दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने भारतामध्ये मानव मुक्तीची सुरुवात होती. कारण येथील धर्म व्यवस्थेने बहुसंख्य असलेल्या लोकांना समानता नाकारली होती. त्यामुळे प्रतिभा असूनही त्यांना प्रकट होता येत नव्हते. ती प्रतिभा संविधानामुळे प्रकट झाली. म्हणूनच २६ जानेवारी हा दिवस जसा प्रजासत्ताक दिन म्हणून आम्ही आनंदाने साजरा करतो, तसाच त्या दिवशी माणूसपण बहाल करणाऱ्या संविधानाचाही गजर करणे आवश्यक आहे. आपल्या हक्क आणि अधिकारासाठी ज्याप्रमाणे आपण जागृत असतो आणि ते मिळवण्यासाठी अनेकदा रस्त्यावर उतरतो; त्याचप्रमाणे या देशाप्रती आमची काही कर्तव्ये आहे व ती कर्तव्ये एक भारतीय नागरिक म्हणून देशाच्या हितासाठी आपण पार पाडली पाहिजे याची जाणीव आम्हाला प्रत्येकाला असली पाहिजे. राज्यकर्त्यांवर दबाव निर्माण करायचा असेल तर नागरिक सुद्धा तेवढ्याच प्रकारे जागृत आणि जबाबदारीचे भान असणारे असणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्ट राज्यकर्त्यावर ढकलून चालणार नाही, तर संविधानाने आम्हाला सुद्धा अनेक अधिकार दिलेले आहे, त्याचा वापर आम्ही देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी केला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक झाला आणि संविधानाचा अर्थ आम्हाला समजला असे आपण म्हणू शकतो.

*भारतीय प्रजासत्ताक दिन*

भारतीय प्रजासत्ताक दिवस दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. ‘भारताचे संविधान’ संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर १९२९ रोजी लाहोर जवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते, भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते नि आदर व्यक्त केला जातो. भारताला ब्रिटीश राजवटी पासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष, ११ महिने नि १८ दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्त लिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला.

*उत्सव*
दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिल पासून राष्ट्रपती भवन पर्यंत राजपथ मार्गाद्वारे केले जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणार्‍या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरु होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात. प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते. भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग; घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे, क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाच्या सादरीकरणाची पूर्वतयारी विशेष काळजीपूर्वक आणि शिस्तीने केली जाते. नवी दिल्ली येथे होणार्‍या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.

*राष्ट्रीय सुट्टी*

२६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. प्रजासत्ताक दिवशी देशात सार्वत्रिक राष्ट्रीय सुट्टी असते. यादिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.

*चित्ररथ*

या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो. या चित्ररथांच्या सादरीकरणाची विशेष पूर्वतयारी सर्व राज्यांचे कलाकार काही दिवस आधी करतात. या चित्ररथ सादरीकरणाला विशेष पारितोषिकही दिले जात असल्याने प्रत्येक राज्य आपापल्या संस्कृतीचे दर्शन अधिक चांगल्या पद्धतीने दिसून येईल यासाठी प्रयत्न करते.

*ध्वजवंदन*

भारतातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तसेच शासकीय संस्था, खाजगी संस्था, ग्रामपंचायती अशा विविध ठिकाणी २६ जानेवारी रोजी ध्वजवंदन केले जाते आणि भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त केला जातो.

*विशेष संचलन*

स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत १९५० साली राजधानी दिल्ली येथे राजपथावर पहिले संचलन आयोजित करण्यात आले. भारताच्या विविधतेतून एकता या वैशिष्ट्याला ही मानवंदना होती. २०१६ साली ६७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासननाच्या शिष्ट समितीतर्फे मरीन ड्राइव्ह येथेही एक संचलन आयोजित करण्यात आले.

*संदेशशुभेच्छापत्रे*

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या ओळी, तिरंंगा ध्वज आदि संंकल्पनांचा कल्पक वापर करून परस्परांना शुभेच्छा दिल्या जातात. देशाभिमान मनात टिकून राहण्यासाठी भारतीय नागरिक अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन परस्परांमधले ऐक्य टिकवून ठेवण्याचे आवाहन करतात.

*प्रमुख अतिथी*
सन १९५० पासून भारत देश प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसर्‍या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित करतात.

लेखक :- शिवश्री निंबा पाटील, अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!