अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या या दुःखात सहभागी होत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालिका, माजी जिल्हा परिषद सदस्या तथा माजी नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई अनिल पाटील यांचा वाढदिवस यंदा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा संवेदनशील निर्णय घेण्यात आला आहे. आज दि. २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या वाढदिवसानिमित्त कोणीही हार, शाल किंवा बुके न आणता त्याऐवजी थेट शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

दरवर्षी जयश्रीताई पाटील यांचा वाढदिवस अमळनेर शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. मात्र, यंदा पावसाअभावी पिके करपल्याने बळीराजावर अस्मानी संकट कोसळले आहे. अशा कठीण प्रसंगी वाढदिवसावर अनावश्यक खर्च करणे उचित ठरणार नसल्याची भूमिका पक्षाने घेतली आहे.

