अमळनेर : तालुक्यातील सारबेटे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) म्हणजेच आरपीआय (आ) आणि अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने आयोजित पक्षप्रवेश व शाखा उद्घाटन मेळावा प्रचंड उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विविध समाजघटकांतील सुमारे २०० कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश करत आरपीआय (आ) मध्ये प्रवेश केला. यामुळे तालुक्यात पक्षाची ताकद कमालीची वाढली आहे.

दिग्गजांची उपस्थिती आणि मार्गदर्शन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीआय (आ) चे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून धुळे जिल्हाध्यक्ष प्रभाकर जाधव, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत वाघ, भुसावळचे नगरसेवक रोहन सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते आबा खंडारे आणि अमळनेर तालुकाध्यक्ष यशवंत बैसाने उपस्थित होते.

राजू सूर्यवंशी (जिल्हाध्यक्ष): “जात, धर्म आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन आपण सर्व भारतीय आहोत या भावनेने काम करण्याची गरज आहे. गरीब, वंचित आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देणे हेच प्रत्येक कार्यकर्त्याचे ध्येय असले पाहिजे.” त्यांनी युवकांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन केले.
प्रभाकर जाधव: “पक्ष संघटना गावपातळीपर्यंत मजबूत करून वंचित व दुर्बल घटकांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे लढणे गरजेचे आहे.”
शशिकांत वाघ: “युवकांनी समाज परिवर्तनासाठी पुढाकार घेऊन संघटनात्मक बळ वाढवावे.”
यशवंत बैसाने (तालुकाध्यक्ष): “सामाजिक सलोखा, विकास आणि न्यायासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे ही काळाची गरज आहे.”
