अबब…..मुद्रांक घोटाळ्यात या तिघांवर गुन्हा दाखल.

अमळनेर : बनावट मुद्रांक (स्टॅम्प पेपर) खरा असल्याचे भासवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲड. अभिजित बिऱ्हाडे यांच्या कायदेशीर सतर्कतेमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला असून, या धडक कारवाईमुळे बनावट दस्तऐवज बनवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

नेमके प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, १२ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अमळनेर तहसील कार्यालयात अव्वल कारकून अनिल परदेशी यांच्याकडे वीरेंद्र राजेंद्र सोनवणे (रा. गंगापुरी, ता. धरणगाव), कविता पंडित भिल (रा. सत्रासेन, ता. चोपडा) आणि राजेंद्र जगन्नाथ जोशी (रा. अमळगाव) हे आले होते. अंतूर्लीकर विवाह मंडळाच्या विवाह सत्यतेसाठी १०० रुपयांचे प्रतिज्ञापत्र ऑनलाईन नोंदणी करून त्यावर शिक्का व स्वाक्षरी मिळवण्यासाठी त्यांनी ते सादर केले होते. संबंधित प्रतिज्ञापत्र त्यावेळी अनिल परदेशी यांनी प्रमाणित केले होते.

ॲड. बिऱ्हाडे यांची तक्रार आणि चौकशी:

दरम्यानच्या काळात, सदर प्रतिज्ञापत्र हे मूळ नसून रंगीत झेरॉक्सच्या आधारे बेकायदेशीररीत्या तयार करण्यात आल्याची बाब ॲड. अभिजित बिऱ्हाडे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी सामाजिक व कायदेशीर जबाबदारीने २० एप्रिल २०२६ रोजी पोलिसांत आणि महसूल प्रशासनाकडे रीतसर तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य ओळखून नायब तहसीलदार ए. पी. कुलकर्णी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान संशयित तिघांनाही त्यांचे मूळ प्रतिज्ञापत्र कार्यालयासमोर सादर करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांनी मूळ मुद्रांकपत्र सादर केले नाही आणि यावर कोणताही कायदेशीर खुलासा दिला नाही.

गुन्हा दाखल व तपास:

मुदत देऊनही मूळ दस्तऐवज सादर न केल्यामुळे तसेच कोणताही ठोस खुलासा न दिल्यामुळे, शासनाची जाणीवपूर्वक फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी अव्वल कारकून अनिल परदेशी यांना प्राधिकृत करण्यात आले. त्यांच्या फिर्यादीवरून वीरेंद्र राजेंद्र सोनवणे, कविता पंडित भिल आणि राजेंद्र जगन्नाथ जोशी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८ व ३४२ अन्वये अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या खळबळजनक प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!