रुग्णांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही! आमदार अनिल पाटील यांचा कडक इशारा; २ महिन्यात काम पूर्ण करण्याचे आदेश.

अमळनेर : माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी आज येथील ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन मजल्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे पाहून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना तीव्र शब्दांत धारेवर धरले आणि हे काम कोणत्याही परिस्थितीत पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे कडक आदेश दिले.

   ​पाहणी दरम्यान वर्षभरापासून बंद असलेले स्वच्छतागृह, तुटलेले दरवाजे आणि अस्वच्छ बेडशीट पाहून आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “रुग्णांच्या आरोग्याशी कोणताही खेळ खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा देत त्यांनी या त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. तसेच तालुक्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘उष्माघात कक्षा’ची विशेष पाहणी केली. या कक्षात कुलर, थंड पाणी आणि पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताळे यांच्याकडून त्यांनी रुग्णालयाच्या एकूण व्यवस्थेचा आढावा घेतला.

​याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, विजय पाटील, जयेश पाटील यांच्यासह रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जि. एम. पाटील, डॉ. संदीप जोशी, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. सुमित पाटील, डॉ. परेश पाटील आणि बांधकाम अभियंता भागवत माळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!