अमळनेर : “आमदार स्वतः तापी नदीवरील वाळू उपशासाठी नदीपात्रात खड्डे करून आणि रस्ते बांधून पाणी अडवत आहेत. जनतेची दिशाभूल करून पाण्याचे राजकारण करणे त्यांनी थांबवावे,” अशा कडक शब्दांत पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील यांनी आमदार अनिल पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. अमळनेर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्यास आमदारांचे वाळू ठेकेच कारणीभूत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
वाळू उपशासाठी पाण्याचे नैसर्गिक प्रवाह रोखले
प्रेस नोटमध्ये नमूद केल्यानुसार, तापी नदीपात्रात आमदारांचे पाच वाळू ठेके आहेत. स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी नदीपात्रात अवैधरित्या मोठे खड्डे करण्यात आले आहेत. वाळू वाहतुकीसाठी नदीत ठिकठिकाणी रस्ते व बांध घातल्याने जळोदच्या दिशेने येणारे पाणी अडकून पडले होते. यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.
सत्ताधाऱ्यांची ‘ऑन द स्पॉट’ कारवाई
तहसीलदारांनी नदीपात्रातील रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिल्यानंतर, आमदारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी लाचलुचपत विभागाचा वापर करून अडकवण्याचा प्रयत्न केला, असा खळबळजनक आरोप पाटील यांनी केला आहे. मात्र, शिवसेनेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सत्ताधारी नगरसेवकांनी प्रत्यक्ष पाहणी करून जेसीबीच्या साहाय्याने हे अवैध बांध फोडले आहेत. यामुळे आता डोहातील पाणी पातळी वाढली असून शहरवासीयांना नियमित पाणी मिळणार असल्याची ग्वाही देण्यात आली आहे.
”सत्ता गेल्यानंतरच जनतेचा कळवळा येतो का?”
आमदारांच्या टीकेला उत्तर देताना सभापती म्हणाले की, “आपले ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे बघावे वाकून अशी आमदारांची अवस्था आहे. जेव्हा त्यांच्या सौभाग्यवती नगराध्यक्ष होत्या, तेव्हा भर पावसाळ्यात हंडा मोर्चा का निघाला होता? सत्ता असताना पाणीपट्टी ९०० वरून १८०० रुपये करताना जनतेचा विचार का केला नाही?” असा बोचरा सवालही त्यांनी विचारला.
२४x७ योजनेचे काम युद्धपातळीवर
अमळनेरच्या भविष्यासाठी २४x७ पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी माजी आमदार शिरीषदादा चौधरी आणि नगराध्यक्षांनी ठेकेदाराला सक्त सूचना दिल्या आहेत. तसेच वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावर उपाय म्हणून भविष्यात ‘सोलर यंत्रणा’ कार्यान्वित करण्याचा मानस असल्याचेही कैलास पाटील यांनी स्पष्ट केले.
“आम्ही गोरगरीब जनतेच्या पैशांची नासाडी होऊ देणार नाही. राजकारणासाठी राजकारण करण्यापेक्षा आमदारांनी मतदारसंघाच्या विकासाची काळजी करावी. आमचे शब्द हे केवळ आश्वासन नसून अमळनेरकरांना दिलेले वचन आहे.”
— कैलास पाटील, पाणी पुरवठा सभापती, नगरपरिषद अमळनेर.