“जनता तडफतेय, सत्ताधारी सुस्त! अमळनेरच्या पाणी टंचाईचा ‘बास्ट’ आणि आमदार अनिल पाटलांचा इशारा.”

अमळनेर : “जनतेच्या जीवावर नगरपालिकेत सत्ता मिळवून दोन दिवसाआड पाणी देण्याचे माजी आमदारांचे आश्वासन पूर्णपणे फोल ठरले आहे. अनेक वर्षांनंतर यंदाच्या उन्हाळ्यात अमळनेरची जनता पाण्यासाठी व्याकुळ झाली असताना सत्ताधाऱ्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही,” असा घणाघाती आरोप राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी केला आहे. गेल्या दीड महिन्यापासून शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, पालिकेचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नियोजनाचा बोजवारा; १०-१० दिवस पाणी नाही

​आमदार अनिल पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, अमळनेरची जनता नियमित पाणीपट्टी भरते, मात्र त्यांना मूलभूत सुविधा पुरवण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. सध्या उन्हाचा पारा वाढलेला असताना शहरात १०-१० दिवस पाणी मिळत नाही, आणि मिळाले तरी ते अत्यंत कमी दाबाने येते. जळोद डोहातील पाणी आटल्याने आता गंगापुरी डोहातून पाणी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र नदीचे आवर्तन का घेतले जात नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “४० लाख रुपये खर्च झाले तरी चालतील, तो जनतेचाच पैसा आहे. एखादे काम कमी करा, पण लोकांना पाणी द्या,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

२०० कोटींची पाणी योजना थंडबस्त्यात

​शहराच्या पुढील ५०-६० वर्षांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी आमदार अनिल पाटील यांनी २०० कोटींची ‘२४ बाय ७’ योजना धरणावरून मंजूर करून आणली होती. याचे कामही सुरू झाले होते, मात्र सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हे काम आता थंडबस्त्यात पडले आहे. मतदारसंघाचा पालक या नात्याने मी स्वतः या योजनेकडे लक्ष देऊन कामाला गती देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नगरसेवक ‘बाहुले’, चावी दुसऱ्याच्या हातात!

​नगरपालिकेतील सद्यस्थितीवर भाष्य करताना आमदार पाटील म्हणाले की, “जनतेने निवडून दिलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना ‘खेळण्यातले बाहुले’ बनवून ठेवले आहे. त्यांची चावी कोणा दुसऱ्याच्या हातात आहे. लोकप्रतिनिधींनी कोणाचे बाहुले बनणे हे लोकशाहीसाठी घातक आहे.” काही नगरसेवक पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांवर दबाव आणून स्वतःच्या भागात जास्त पाणी सोडून घेत असल्याच्या तक्रारीही त्यांनी मांडल्या.

ठेकेदारीमुळे यात्रेचे नियोजनही कोलमडले

​अमळनेरची धार्मिक परंपरा असलेल्या बोरी पात्रातील यात्रोत्सवात प्रथमच ठेकेदारी आणि वसुलीचा प्रयोग करण्यात आला. यामुळे बाहेरील विक्रेते आणि पाळणेवाले नाराज झाले असून, यात्रेचे संपूर्ण नियोजन फेल गेल्याची टीकाही त्यांनी केली.

इशारा:

“शहराचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास शहर विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा आमदार अनिल पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!