अमळनेर : अमळनेर नगरपरिषदेच्या आरोग्य समितीचे माजी सभापती आणि भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. श्याम जयवंतराव पाटील यांनी पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून, यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.त्यांनी आपला राजीनामा भारतीय जनता पक्षाचे जळगाव (पश्चिम) जिल्हाध्यक्ष मा. राधेश्यामजी चौधरी यांच्याकडे पाठवला आहे.

राजीनाम्याचे मुख्य कारण: आंदोलक तरुणांवरील पोलिसांची कारवाई
राजीनामा पत्रात श्याम पाटील यांनी दिल्लीतील जंतर-मंतर व संसद भवन परिसरात घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. देशभरातील हजारो तरुण आपल्या भवितव्यासाठी, अस्तित्वासाठी आणि शिक्षणाच्या हक्कासाठी शांततामय मार्गाने आंदोलन करत होते. मात्र, या तरुणांशी कोणतीही चर्चा न करता त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
पत्रातील महत्त्वाचे मुद्दे:
लोकशाही मूल्यांची पायमल्ली : शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि तरुणांवर दडपशाही करणे हे लोकशाही मूल्यांना बाधा आणणारे आहे.
संवादाचा अभाव : तरुणांचे प्रश्न ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावर शक्तीचा वापर करणे अत्यंत वेदनादायी असून अंतःकरणाला अस्वस्थ करणारे आहे.
वैचारिक मतभेद : लोकशाहीत मतभेदांचे उत्तर संवादातून आणि संवेदनशीलतेतून दिले पाहिजे. सध्याच्या या घडामोडींमुळे माझ्या वैचारिक भूमिकेत आणि पक्षाच्या भूमिकेत मूलभूत मतभेद निर्माण झाले आहेत.
“माझ्या वैचारिक प्रामाणिकतेला, सामाजिक भूमिकेला अनुसरून आणि सदसदविवेकबुद्धीच्या आदेशानुसार मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे.”
— श्याम जयवंतराव पाटील (माजी सभापती – आरोग्य समिती, अमळनेर नगरपरिषद)
