शिक्षणाची उमेद जागवणारा उपक्रम: प्रताप हायस्कूलमध्ये २५ गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप…… स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गणेश भामरे यांच्या दातृत्वातून सामाजिक उपक्रम; पाडळसरे धरणासाठीच्या प्रयत्नांना दिला उजाळा

अमळनेर : शिक्षणासाठी आर्थिक अडचण कधीही अडसर ठरू नये, या सामाजिक जाणिवेतून खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप हायस्कूल येथे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २५ गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. पोलीस पाटील तथा शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन गणेश भामरे यांच्या दातृत्वातून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात शेतकी संघाचे चेअरमन संभाजी पाटील व गणेश भामरे यांच्या हस्ते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली. यानंतर मुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. बाविस्कर यांनी उपस्थितांचे स्वागत करत कार्यक्रमामागील सामाजिक उद्देश स्पष्ट केला.

विकासपुरुष अजितदादांच्या आठवणींना उजाळा

आपल्या मनोगतात बोलताना गणेश भामरे यांनी स्व. अजितदादा पवार यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या आठवणींना उजाळा दिला. अजितदादांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा तसेच अमळनेरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाडळसरे धरणासाठी त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. तसेच, आमचे नेते व मार्गदर्शक माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने प्रेरित होऊन या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमातून स्व. अजितदादांना आदरांजली व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोपात शिक्षक प्रतिनिधी दिनेश पालवे यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रभावी प्रशासनशैली, निर्णयक्षमता आणि जनसामान्यांशी असलेल्या घट्ट नात्यावर प्रकाश टाकला.

गणवेश वितरणाने फुलले चेहऱ्यावर हास्य

मान्यवरांच्या हस्ते २५ गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे हास्य फुलवणारा हा गणवेश केवळ पोशाख नसून शिक्षणाची नवी उमेद ठरत असल्याचा सूर याप्रसंगी उमटला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास खांजोडकर यांनी केले, तर आभार सचिन अहिरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निखिल पाटील, कृष्णा कोळी, सागर पवार, प्रसाद बुवा, जयश्री पाटील आणि नम्रता दोरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!