अमळनेर शिक्षण विभागात ‘वेतन अडवणुकीचा’ गलिच्छ खेळ; २५ वर्षे सेवा देणाऱ्या गुरुजींची चूल विझण्याच्या मार्गावर! ​…….आधी पाच महिने, आता सात महिने; शिक्षणाधिकारी आणि वेतन अधीक्षकांच्या ‘संगनमताने’ कर्मचाऱ्यांची कोंडी?

अमळनेर :जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील श्री शिवाजी हायस्कूल तांबेपुरा येथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत शिक्षण विभागाने चालविलेला छळ आता पराकोटीला पोहोचला आहे. तब्बल २५-२५ वर्षे निष्ठेने सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या सात महिन्यांचे वेतन पुन्हा एकदा रोखण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण आणि वेतन अधीक्षक रियाज तडवी यांच्या मनमानी कारभारामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, या प्रकरणाने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

​     सविस्तर वृत्त की,शाळेतील कर्मचारी संचमान्यतेनुसार पूर्णपणे पात्र असताना आणि त्यांचे पगार बिल शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध असतानाही, जाणीवपूर्वक वेतन रोखले जात असल्याचा आरोप होत आहे. वरिष्ठांचे कोणतेही नकारात्मक आदेश नसताना केवळ ‘संगनमताने’ हे वेतन थांबवले जात असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

प्रशासकीय ‘दप्तरदिरंगाई’ की जाणीवपूर्वक छळ?

शिक्षण विभागातील या दिरंगाईमुळे कर्मचाऱ्यांचे जगणे असह्य झाले आहे. सात महिने पगार नसल्याने उद्भवलेली परिस्थिती भीषण आहे:

कर्जाचा विळखा: गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि सोसायटीचे हप्ते थकल्याने बँकांकडून जप्तीच्या नोटिसा येण्याची भीती निर्माण झाली आहे.

इन्कम टॅक्सचा फटका: वेतन वेळेवर न मिळाल्याने आयकर कपातीची प्रक्रिया रखडली आहे, परिणामी कर्मचाऱ्यांना मोठ्या दंडाला सामोरे जावे लागू शकते.

आर्थिक कुचंबणा: दैनंदिन गरजा, मुलांचे शिक्षण आणि औषधोपचारासाठी कर्मचाऱ्यांना आता इतरांकडे हात पसरण्याची वेळ आली आहे.

“ज्या कर्मचाऱ्यांनी आयुष्याची २५ वर्षे ज्ञानदानात घालवली, त्यांना स्वतःच्या हक्काच्या पगारासाठी वारंवार लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवावे लागतात, हे शिक्षण विभागाचे मोठे अपयश आहे.”

— त्रस्त कर्मचारी

आता थेट ‘मंत्रालया’पर्यंत गाऱ्हाणे मांडणार?

​     एकदा नव्हे तर दोनदा जाणीवपूर्वक पगार अडवल्यामुळे आता शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने आणि शिक्षण उपसंचालकांनी या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण आणि वेतन अधीक्षक रियाज तडवी यांची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. जर येत्या काही दिवसांत वेतन अदा झाले नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!