उलट तपासणी केली म्हणून वकिलाला न्यायालय आवारात मारहाण : बहीण-भावाविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर : न्यायालयात उलट तपासणी घेतल्याचा राग मनात धरून बहीण-भावांनी वकिलाला मारहाण करत खांदा फ्रॅक्चर केल्याची धक्कादायक घटना अमळनेर न्यायालयाच्या आवारात घडली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी वकिलाच्या गळ्यातील १० ग्राम सोन्याची चेन हिसकावून पळवली. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनाक्रम

अमळनेर येथील ऍड. प्रशांत रमेश बडगुजर (रा. विद्यानगर, धुळे रोड, अमळनेर) हे २०१५ पासून वादी रवींद्र पुरुषोत्तम पवार (रा. दहिवद) यांच्यातर्फे न्यायालयात खटला लढत आहेत. हा खटला न्यायाधीश एलमाणे यांच्या न्यायालयात सुरू असून, वादी विरुद्ध पुरुषोत्तम सोनू पवार, राजेंद्र पुरुषोत्तम पवार, वैशाली राजेंद्र पवार, सुमनबाई पुरुषोत्तम पवार, मीनाक्षी कैलास भामरे, प्रियंका निशांत पाटील या प्रतिवादींचा समावेश आहे.

४ मार्च रोजी दुपारी, ऍड. प्रशांत बडगुजर यांनी मीनाक्षी कैलास भामरे (रा. कवठळ, ता. धुळे) हिची उलट तपासणी घेतली. तपासणी संपल्यानंतर वकील बडगुजर न्यायालयाच्या बाहेर ओट्यावर उभे असताना राजेंद्र पवार तेथे आला आणि “माझ्या बहिणीला उलटसुलट प्रश्न का विचारले?” असा जाब विचारू लागला. यावर बडगुजर यांनी आपण वादी पक्षाचे वकील असल्याचे स्पष्ट केले. मात्र, यावर संतापून राजेंद्र पवारने वकिलाच्या तोंडावर आणि खांद्यावर मारहाण केली, त्यामुळे त्यांचा खांदा फ्रॅक्चर झाला.

इतक्यावरच न थांबता मीनाक्षी भामरे हिने खाली पाडून चपलेने मारहाण केली. त्याचवेळी राजेंद्र पवारने वकिलाच्या गळ्यातील १० ग्राम सोन्याची चेन हिसकावून ती आपल्या मित्राकडे दिली, आणि तो मित्र घटनास्थळावरून निघून गेला. तसेच, न्यायालयीन कामकाजासाठी लावलेला बॅन तोडून नुकसान केले.

जीवघेणी धमकी

मारहाणीनंतर जाताना राजेंद्र पवार आणि मीनाक्षी भामरे यांनी वकिलाला कोर्टाच्या बाहेर निघण्यास सांगितले आणि “तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली. या प्रकरणामुळे वकिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुन्हा दाखल

याप्रकरणी ऍड. प्रशांत बडगुजर यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, त्यावरून भारतीय दंड संहितेच्या कलम ३०९(४), ११८(१), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करत आहेत.

वकिलांमध्ये संतापाची लाट

या घटनेमुळे वकिलांमध्ये तीव्र संताप आहे. न्यायालयाच्या आवारातच वकिलाला मारहाण होणे हे गंभीर प्रकरण असून, दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वकिलांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!